तेल कराराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेने ‘टॅरिफ’वरून भारताला धक्का दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करत तेलाशी संबंधित करार केला आहे. ट्रम्प यांनी गुरुवार, 31 जुलै रोजी सोशल मीडियाद्वारे यासंबंधीची माहिती दिली. अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या करारांतर्गत दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर एकत्रित काम करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा केली आहे. याअंतर्गत पाकिस्तानचे तेल साठे विकसित केले जाणार आहेत. या कराराची घोषणा करतानाच ट्रम्प यांनी एक महत्त्वाचे विधान करताना ‘पाकिस्तान भविष्यात भारताला तेल विकू शकेल.’ असेही स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर ‘आम्ही पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. या करारानुसार पाकिस्तान आणि अमेरिका विविध तेल साठे विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील. आम्ही एक तेल कंपनी निवडत असून ती या भागीदारीचे नेतृत्व करेल.’ अशी टिपण्णी केली आहे.
गेल्यावर्षी पाकिस्तानात सापडले तेलाचे साठे
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या सागरी सीमेवर तेल आणि वायूचा मोठा साठा सापडला होता. पाकिस्तानी मीडिया हाऊस डॉनच्या मते, एका मित्र देशाच्या सहकार्याने या भागात तीन वर्षे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर तेल आणि वायूच्या साठ्याची पुष्टी झाली होती. काही अहवालांनुसार, हा साठा जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल आणि वायूचा साठा असेल. सध्या व्हेनेझुएलामध्ये सर्वात मोठा तेल साठा असून तिथे 34 लाख बॅरल तेल आहे. त्याच वेळी, अमेरिकेकडे सर्वात शुद्ध तेलाचा साठा असून तो अद्याप वापरात आलेला नाही.
तेल-वायू काढण्यासाठी 4-5 वर्षे लागणार
पाकिस्तानमधील तेलसाठ्यांशी संबंधित संशोधन पूर्ण करण्यासाठी सुमारे 42 हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. समुद्राच्या खोलीतून ते काढण्यासाठी 4-5 वर्षे लागू शकतात. संशोधन यशस्वी झाल्यानंतर तेल आणि वायू काढण्यासाठी, विहिरी बसवण्यासाठी आणि इतर पायाभूत सुविधा बांधण्यासाठी अधिक पैशांची आवश्यकताही भासू शकेल. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तेल आणि वायूच्या साठ्यांचा शोध हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी असल्याचे वर्णन केले आहे.









