हिंदीमुळे अनेक भाषा नष्ट झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ चेन्नई
जाहीर व्यासपीठावरुन सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आता हिंदी भाषेला लक्ष्य केले आहे. हिंदीमुळे तमिळ भाषेचे अस्तित्व संपू शकते असा इशारा त्यांनी दिली आहे. तसेच यादरम्यान त्यांनी निधीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उदयनिधी यांनी 2023 मध्ये सनातन धर्माची तुलना कोविड सारख्या आजारांसोबत केली होती.
तामिळनाडूची राजधानी चेन्नईत इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत. हिंदीने उत्तरेकडील राज्यांच्या स्थानिक भाषा म्हणजेच राजस्थानी, हरियाणवी, भोजपुरी आणि अन्य बिहारी भाषांना संपविले आणि प्रमुख स्थानिक भाषा ठरली. तामिळनाडूत हिंदी भाषेतील शिक्षण लागू केले तर येथेही हेच घडणार असल्याचा दावा उदयनिधी यांनी केला. विदेशात आणि इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करणारे जवळपास 90 टक्के तमिळ भाषिक हे हिंदी न शिकविल्या जाणाऱ्या शाळेत शिकले आहेत. मागील काळात शिक्षणात हिंदी भाषेला स्थान देण्याच्या विरोधात तामिळनाडूत मोठी निदर्शने झाली आहेत. थलमुथु, नटराजन आणि कीझपालुर चिन्नास्वामी यासारख्या हुतात्म्यांनी राजकारण नव्हे तर तमिळ भाषेसाठी बलिदान केले होते. आमच्या भाषेसाठी जीव अर्पण करण्यासाठी हजारो लोक तयार असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्याला निधी मिळणे बंद झाल्यास राज्यस्तरावर विरोध सुरू होईल असा इशाराही त्यांनी केला. भाजप एक राष्ट्र, एक भाषा धोरण लागू करू इच्छित असल्यानेच हिंदी भाषा लादू पाहत आहे असा दावा निदर्शनांमध्ये सामील व्हीसीकेचे अध्यक्ष तोल तिरुमललावन यांनी केला.









