रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापले असताना ठाकरे गटाने काल राज्य सरकार विरूद्ध मोर्चा काढला होता. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी ठाकरे गटावर टिका करून महिलांना पुढे करून ठाकरे राजकारण करत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडीयाच्या माध्यमातून नाहक बदनामी केली जात असल्याने अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही भावना गवळी म्हणाल्या.
राज्यात रोशनी शिंदे प्रकरणानंतर राजकिय वातावरण चांगलेच तापले असताना ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यांनी राज्यातील कायदा व्यवस्था ढासळल्याचा आरोप करून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच त्यांनी यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.
त्यानंतर शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गट महिलांना पुढे करून राजकारण करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या “ठाकरे गटानं रोशनी शिंदे प्रकरण लावून धरलं आहे. परंतु पोलिसांच्या तपास अहवालात काहीही आढळून आलेलं दिसत नाही. रोज सकाळी उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत सुटायचं हा कार्यक्रम ठाकरे गटाने चालवला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांची सगळ्यात आधी चौकशी झाली पाहीजे. शीतल म्हात्रे प्रकरणात पोलीस तपासात जे निष्पन्न झाले, त्याचा अहवाल का मागितला जात नाही. एक महिला म्हणून त्यांच्या पाठिशी यांच्यातील कोणी उभे राहिले नाहीत. आता महिलांना समोर करून राजकारण करण्यात येत आहे. ” असे मत खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केले.








