मध्य आफ्रिकन देशात सैन्याने हाती घेतली सूत्रे : निवडणुकीचा निकाल फेटाळला : सीमा केली बंद
वृत्तसंस्था/ लिबरव्हिले
नायजरनंतर आता मध्य आफ्रिकन देश गॅबनमध्ये सत्तापालट झाला आहे. देशाच्या सैन्याने निवडणुकीचा निकाल फेटाळत सर्व सरकारी संस्था भंग केल्या आहेत. तसेच सर्व सीमा बंद करण्याचे पाऊल उचलले आहे. सरकारी प्रसारमाध्यम गॅबन 24 वरून सैन्याधिकाऱ्यांनी देशाला संबोधित करताना आम्हाला निवडणुकीवर विश्वास नव्हता, याचमुळे हे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे.

27 ऑगस्ट रोजी झालेल्या वादग्रस्त निवडणुकीनंतर अध्यक्ष अली बॉन्गो ओडिन्म्बा हे तिसऱ्यांता विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. याच्या 3 दिवसांनी सैन्याने सत्ता स्वत:च्या हाती घेत आम्ही देशात शांततेसाठी वर्तमान सरकारला हटविल्याचे सांगितले आहे. हा निर्णय गॅबनच्या सर्व संरक्षण दलांच्या आणि सैन्याच्या सहमतीने घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजधानीत गोळीबाराचा आवाज
सत्तापालटाच्या घोषणेनंतर गॅबनची राजधानी लिबरेव्हिलेमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू आला आहे. परंतु सरकार किंवा अधिकाऱ्यांकडून यासंबंधी कुठलेच वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. तर गॅबनमध्ये शनिवारी संचारबंदी आणि निवडणुकीमुळे तणावाचे वातावरण होते. विरोधकांकडून सातत्याने बदल आणि बॉन्गो शासनाच्या समाप्तीची मागणी केली जात होती.
53 वर्षांपासून बॉन्गो कुटुंबाची सत्ता
अध्यक्ष बॉन्गो यांना 64.27 टक्के तर विरोधी उमेदवार एल्बर्ट ऑन्डो ओस्सा यांना 30.77 टक्के मते प्राप्त झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. सत्तापालटानंतर बॉन्गो कुटुंबाच्या 53 वर्षांच्या सत्तेची अखेर झाली आहे. निवडणुकीवेळी इंटरनेट बंद करत संचारबंदी लागू करण्यात आली होती. अध्यक्ष बॉन्गो यांनी निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी हे पाऊल उचलले होते असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. निवडणूक निकालानंतर फ्रेंच प्रसारमाध्यम फ्रान्स24, आरएफआय आणि टीव्ही5 मॉन्डे मीडिया हाउसवर बंदी घालण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान पक्षपात करणे आणि संतुलन बिघडविण्याच आरोप या प्रसारमाध्यमांवर करण्यात आला होता.
2009 साली अध्यक्षपदी
बॉन्गो हे गॅबनीज डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आहेत. त्यांचे वडिल उमर बॉन्गो यांनी या पक्षाची स्थापना केली होती. 1967 पासून 2009 पर्यंत ते देशाचे अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन संरक्षण मंत्री अली बॉन्गो हे अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून त्यांच्याकडेच देशाची सूत्रे आहेत. सत्तापालट यशस्वी ठरल्यास मागील 3 वर्षांमध्ये पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत झालेले हे आठवे सत्तापालट ठरणार आहे. यापूर्वी माली, गिनी, बुर्किना फासो, चाड आणि अलिकडेच नायजरमध्ये सैन्याने सत्तेची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली होती.
मागील महिन्यात नायजरमध्ये सत्तापालट
पश्चिम आफ्रिकन देश नायजरमध्ये 26 जुलै रोजी सैन्याने सत्तापालट घडविला होता. काही सैनिकांनी अध्यक्षीय भवनात शिरून त्यावर नियंत्रण मिळविले होते. याचबरोबर अध्यक्ष मोहम्मद बज्म यांना सत्तेवरून हटवत त्यांना कैद केले होते. तेथील सैन्याने सत्तापालटाची घोषणा राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून केली होती. कर्नल अमादौ अब्द्रमाने यांनी अन्य सैन्याधिकाऱ्यांसोबत मिळून सत्तेची धुरा आता स्वत:च्या हाती ठेवली आहे.









