वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या 24 तासात आसामपासून पाकिस्तानपर्यंत सुमारे सहावेळा भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये 5.5 तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे धक्के बिहार आणि आसामपर्यंत जाणवले. या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पडले. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी पहाटे 2:36 वाजता भूकंप झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये पहाटे 5:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय तिबेटपर्यंत पृथ्वी हादरली आहे. तथापि, अद्याप कोणत्याही जीवितहानी किंवा नुकसानीचे वृत्त नाही. पण धक्के खूप जोरदार होते.
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी होती. त्याचे केंद्र राजधानी काठमांडूपासून सुमारे 65 किलोमीटर पूर्वेस सिंधुपालचौक जिह्यातील भैरवकुंडा येथे होते. नेपाळमधील भूकंपाचे धक्के पाटणा, सिक्कीम आणि दार्जिलिंगपर्यंत जाणवले. शुक्रवारी पहाटे 5:14 वाजता पाकिस्तानला दुसरा भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानातील बरखानजवळ होते.









