शाहबाज-मुनीर यांच्यासमोर राजवट टिकवण्याचे आव्हान : भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापनामुळे परिस्थिती बिघडली
- ‘पीओके’त तरुण वर्ग बंडाच्या पवित्र्यात
- कॅम्पसमध्ये ‘पाक आर्मी गो बॅक’चे नारे
- शाहबाज शरीफ, असीम मुनीर अस्वस्थ
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
नेपाळनंतर पाकिस्तानच्या ‘जनरेशन-झेड’मध्येही त्यांच्या सरकारविरुद्धचा संताप वाढत आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंसक निदर्शने झाल्यानंतर आता निषेधाची आग पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. सध्या शिक्षण सुधारणांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या ‘जनरेशन-झेड’ म्हणजे युवक व विद्यार्थी समुदायाकडून नेतृत्व केले जात आहे. पाकिस्तानात वाढते शुल्क आणि मूल्यांकन प्रक्रियेविरुद्ध शांततापूर्ण निदर्शने म्हणून निदर्शने सुरू झाली होती, परंतु आता ते शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध मोठ्या चळवळीत रुपांतरित झाले आहे.
हे आंदोलन पाकव्याप्त प्रदेशात तरुण पिढीचा पाकिस्तानबद्दल तीव्र असंतोष दर्शवते. या महिन्याच्या सुरुवातीला ही निदर्शने सुरू झाली. सुरुवातीला हे आंदोलन शांततापूर्ण होते. परंतु एका अज्ञात बंदूकधाऱ्याने विद्यार्थ्यांच्या गटावर गोळीबार केल्याने परिस्थिती चिघळली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये मुझफ्फराबादमध्ये एका व्यक्तीने निदर्शकांवर गोळीबार केल्याचे दिसून आल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. तथापि, व्हिडिओची पडताळणी होऊ शकली नाही. ही घटना पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घडल्याचे बोलले जात आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये उघडपणे बंड
‘जनरेशन-झेड’ नावाची एक नवीन पिढी आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये उघडपणे बंड करत आहे. जम्मू काश्मीर विद्यापीठाच्या कॅम्पसपासून ते मीरपूर आणि रावळकोटपर्यंत सर्वत्र एकच आवाज घुमत आहे. हे विद्यार्थी आंदोलन आता फी वाढ किंवा परीक्षा वादांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते इस्लामाबाद आणि पाकिस्तानी सैन्याविरुद्ध उघड निषेधात रुपांतरित झाले आहे. प्रशासनाविरुद्धचा रोष तीव्र झाल्यामुळे सैन्य आणि पोलीसही अस्वस्थ आहेत.
विद्यापीठाच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ आणि इंटरमिजिएट (एफए आणि एफएससी) विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये फेरफार करण्यावरून या आंदोलनाचा भडका उडाला आहे. नवीन इ-मार्किंग धोरणामुळे जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आल्यामुळे संताप निर्माण झाला. याबाबत विद्यार्थी जाब विचारण्यासाठी पोहोचले असता चर्चेऐवजी पोलीस आणि लष्करी जवानांचा आधार घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि काही ठिकाणी हवेत गोळीबारही करण्यात आला.
विद्यार्थी संघटनांवर बंदी, पण निदर्शने तीव्र
पीओकेमध्ये आर्थिक संकट, भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनामुळे गेल्या काही वर्षांत परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी पाकिस्तान सरकारने विद्यार्थी संघटना आणि विद्यापीठातील सर्व राजकीय उपक्रमांवर बंदी घातली. तथापि, या आदेशाने आगीत तेल ओतले गेले. अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनादरम्यान ‘पाकिस्तान आर्मी गो बॅक’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचेही दिसून आले.
भारताकडून तीव्र आक्षेप
पीओकेमधील लोकांवरील अत्याचारांवर भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडले आहे. पीओकेमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे आणि त्यांना ताब्यात घेणे हे पाकिस्तानचे वास्तव उघड करते, जिथे नागरी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात नाही. पीओके आता पूर्णपणे लष्करी ताब्यात आणि दडपशाहीच्या अधिपत्याखाली असून तिथे तरुणांचे आवाज बंडाच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचे भारताने म्हटले आहे.









