कोल्हापूर :
मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर नागपूरनंतर कोल्हापूर सर्किट बेंच असा बदल करण्यात आला आहे. याबाबतची नोटीसही उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणी सिंधुदुर्ग या सहा जिह्यातील सर्व खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग केले असून, जनहित याचिका दाखल करण्याची तरतूद केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच शुक्रवारी (1 ऑगस्ट) रोजी कोल्हापुरात मंजूर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी राज्यपालांच्या सहमतीने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली. सोमवार (18 ऑगस्ट) पासून कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. तत्पूर्वी सोमवार (4 ऑगस्ट) रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. उच्च न्यायालयाचे रजिस्टर धनंजय देशपांडे यांनी ही नोटीस प्रसिद्ध केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या अपिलेट संकेतस्थळावर काही महत्वपूर्ण बदल करण्याबाबत ही सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर, औरंगाबाद येथे यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच असा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई, नागपूर, औरंगाबाद यानंतर पणजी, गोवा असा उल्लेख होता. यामध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबई, नागपूर नंतर कोल्हापूर असा उल्लेख करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक मेल सेवेद्वारे किंवा इन्स्टंट मेसेजिंग सेवेद्वारे न्यायालयाची थेट सेवा दिवाणी प्रक्रिया कोठे आहे, इलेक्ट्रॉनिक मेल सेवा नियम 2017 द्वारे प्रक्रियेची मुंबई उच्च न्यायालयाची सेवा लागू करण्यात येणार आहे.
- कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी विनंती
कोल्हापूर येथे सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर येथील कामकाजासाठी उच्च न्यायालयातील 160 कर्मचारी कोल्हापूरात येणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जे कर्मचारी मुंबई उच्च न्यायालामध्ये आहेत. त्यांनी कोल्हापूर येथे बदलीसाठी विनंती केली आहे. काही जागांवर बदली हवी असल्यास त्यांनी विनंती करण्याच्या सुचनाही प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
- जनहित याचिकाही होणार दाखल
कोल्हापूर सर्किट बेंच येथे घटनेच्या 226 कलमानुसार जनहित याचिकाही दाखल करता येणार आहेत. यामध्ये अवैध आणि बेकायदेशीर अटकेविरुद्ध वापरली जाणारी रिट, सार्वजनिक किंवा कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडण्यासाठी दिली जाणारी रिट, खालच्या न्यायालयाला किंवा न्यायाधिकरणाला त्याच्या अधिकाराच्या बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी दिली जाणारी रिट, कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक पदावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेला असल्यास त्या विरोधात दिली जाणारी रिट दाखल करण्यात येणार आहेत.
- सहा जिह्यातील खटले वर्ग
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील सहा जिह्यातील मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढील अडीच महिन्याच्या कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये या सहा जिह्यातील सर्व खटले सर्किट बेंचकडे वर्ग केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापुढेही सहा जिह्यातील सर्व खटले कोल्हापूर सर्किट बेंच येथेच दाखल होतील आणि तेथेच संपतील असेही नमूद करण्यात आले आहे.








