अलिकडच्या काळात शस्त्रक्रियेचे विज्ञान प्रचंड प्रमाणात विकसीत झालेले आहे. पूर्वीच्या काळात असाध्य मानले गेलेले अनेक विकार आज शस्त्रक्रियेच्या साहाय्याने बरे करता येत असल्याने मानवी जीवन सुखाचे बनले असून मानवाचे आयुष्यही वाढले आहे. पूर्वीच्या काळातही काही शस्त्रक्रिया केल्या जात. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे उल्लेख आयुर्वेदात आढळतात. तसेच मोडलेले हाडे परत सांधणे, जखमांमधून रक्तस्त्राव होऊ नये म्हणून टाके घालणे आदी शस्त्रक्रिया पूर्वीच्या काळी होत असत, असे उल्लेख त्यावेळी निर्माण पेलेल्या ग्रंथांमध्ये पहावयास मिळतात.
तथापि, गुडघेदुखी आणि गुडघ्याच्या वाट्यांमधील कुर्चा किंवा कार्टिलेज झिजल्यामुळे चालताना तीव्र वेदना होणे या विकारावर पूर्वी कोणतेही औषध नव्हते. त्यामुळे असा विकार झालेल्यांवर घरात बसून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण गेल्या तीस ते चाळीस वर्षांमध्ये ‘नी रिप्लेमेंट’ शस्त्रक्रिया ही सर्वसामान्य झाली आहे. या शस्त्रक्रियेत गुडघ्याच्या वाट्यांच्या स्थानी धातूचे गोल (बॉल्स) बसविले जातात. त्यामुळे रुग्ण व्यवस्थित चालू शकतो. तसेच चालताना त्याला मुळीच वेदना होत नाहीत. अशा प्रकारे या विकारावर जवळपास मात करण्यात आली आहे. शिवाय या शस्त्रक्रियेचा खर्चही अलिकडच्या काळात पूर्वीपेक्षा कमी झाल्याने ही शस्त्रक्रिया सर्वसामान्य झाली आहे. अनेक वृद्ध ही शस्त्रक्रिया करुन घेतात.
तथापि, अशी शस्त्रक्रिया करुन घेतलेल्यांच्या संदर्भात एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. पण ही समस्या अशा व्यक्ती जिवंत असताना निर्माण होत नाही. तर अशा व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर निर्माण होते. कारण मृतदेहाचे दहन केल्यानंतर अस्थी आणि शरिराचे इतर सर्व भागांची राख होते. पण हे धातूचे गोल मात्र, आहे त्याच स्थितीत राहतात. त्यामुळे विसर्जनासाठी अस्थी गोळा करताना या धातूंच्या गोलांचे काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. अलिकडच्या काळात अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढल्याने ही समस्या अनेकांच्या अनुभवास येते. सध्या तरी या समस्येवर उत्तर नाही. या धातूच्या गोलांचे विसर्जन अस्थी म्हणून करता येत नाही, कारण त्या नैसर्गिक अस्थी नाहीत. तसेच त्यांना दहनस्थानी तसेच सोडणे ही देखील मृतांच्या नातेवाईकांच्या मनाला पटत नाही. ही समस्या केवळ भारतात नव्हे, तर पाश्चिमात्य देशांमध्येही आहे, जिथे मृतदेहांचे दहन न करता त्यांना पुरले जाते. ज्या महनीय व्यक्ती असतात त्यांचे दफन झाल्यानंतर त्या जागी अन्य कोणाचे दफन केले जात नाही. तेथे त्यांचे स्मारक बांधून त्यांना चिरस्मरणीय केले जाते. तथापि, सर्वसामान्यांच्या दफनस्थळी काही वर्षांनंतर पुन्हा खोदाई करुन नव्या मृतदेहांचे दफन केले जाते. अशावेळी खोदाई करताना असे धातूचे गोल सापडले की त्यांचे काय करायचे असा प्रश्न संबंधितांना पडतो. अर्थातच, प्रत्येक जण हा प्रश्न आपल्या मार्गाने सोडवितो. एकंदर, अशा नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे जिवंत मानवाचे आयुष्य सुखाचे होत असले, तरी नंतर प्रश्न निर्माण होतो. अर्थात हा प्रश्न फार महत्वाचा नसला तरी एक विचित्र परिस्थिती निर्माण होते हे खरे आहे.









