द्वारकेत सुरु होणार प्रकल्प ः भगवान श्रीकृष्णाची 180 फूट उंच मूर्ती तयार होणार
वृत्तसंस्था / द्वारका
काशी विश्वनाथ (वाराणसी) महाकाल लोक (उज्जैन) आणि मथुरा कॉरिडॉर (मथुरा) नंतर आता द्वारकेत (गुजरात) देवभूमी कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे. द्वारकेला पश्चिम भारतातील सर्वात मोठे आध्यात्मिक केंद्राचे स्वरुप देण्याचे काम केंद्र सरकार करणार आहे. गुजरातमधील या सर्वात मोठय़ा धार्मिक प्रकल्पामुळे द्वारकेचा कायापालट होण्यासह शिवराजपूर सागरी भागालाही विकसित केले जाणार आहे. द्वारकाधीश मंदिरापासून बेट द्वारका तसेच ज्योतिर्लिंग नागेश्वरपर्यंत सर्व मंदिरांना जोडले जाणार आहे.
द्वारका-पोरबंदर-सोमनाथ लिंक प्रकल्पही सुरू होणार आहे. द्वारकेपासून 13 किलोमीटर अंतरावरील शिवराजपूर बीच आणि 23 किलोमीटर अंतरावरील ओखा बीचचा कायापालट घडवून आणण्याचे नियोजन आहे. जन्माष्टमीपासून द्वारका देवभूमी कॉरिडॉरचे काम सुरू होणार आहे.

रामसेतू सिग्नेचर ब्रिज
ओखा येथून बेट द्वारकेला जोडणारा सिग्नेचर ब्रिज तयार होत आहे. 2320 मीटर लांबीच्या या चारपदरी ब्रिजला देशातील सर्वात लांबीचा केबल स्टे ब्रिज म्हटले जाते. या ब्रिजकरता 870 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महाकाल लोकच्या धर्तीवर द्वारकेत द्वारकाधीश मंदिरापासून द्वारका आणि ज्योतिर्लिंग नागेश्वरपर्यंत सर्व मंदिरांना जोडले जाणार आहे. यात द्वारकाधीश मंदिर, रुक्मिणी-बलराम मंदिर, सांवलियाजी मंदिर, गोवर्धननाथ मंदिर, महाप्रभू बैठक, वासुदेव, हनुमान मंदिरापासून नारायण मंदिर देखील सामील आहे.
गोपी तलावाचा होणार कायापालट
लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरात एक ऐतिहासिक वृक्ष असून याच्याच खाली दुर्वासा यांनी ऋषींनी तपस्या केली होती असे बोलले जाते. पर्यटक अन् भाविकांसाठी हा वृक्ष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. तसेच गोपी तलावाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. गोपी तलावाचे पौराणिक महत्त्व आहे.

बेट द्वारकामध्ये गॅलरीची निर्मिती
बेट द्वारकेला जागतिक स्वरुप देण्याची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात 138 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येथे इको टूरिझम, वॉटर स्पोर्ट्स, मरीन इंटरप्रिटेशन सेंटर, लेक प्रंट, डॉल्फिन ह्यूइंग गॅलरी समवेत अनेक प्रकल्प सुरू होतील. तर बुडालेली द्वारकानगरी पाहण्यासाठी विशेष गॅलरी तयार केली जाणार आहे.
साउंड अँड लाइट शो
भगवान द्वारकाधीशाची 108 फुटांची मूर्ती तयार केली जात आहे. भगवान कृष्णाची ही सर्वात उंच मूर्ती ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मूर्ती गोमतीच्या काठावर पंचकुई क्षेत्रात स्थापन केली जाईल. जन्माष्टमीवेळी यासाठीचे भूमिपूजन होणार आहे. मूर्तीवर द्वारकेचा इतिहास, संस्कृती आणि धार्मिक महत्त्व सांगण्यासाठी साउंड अँड लाइट शो केला जाणार आहे.
शिवराजपूरचा विकास होणार
शिवराजपूर बीचला देशातील सर्वोत्तम सागरी किनारा म्हणून ओळखले जाते. या बीचला ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तेथे मोठय़ा प्रमाणावर विकासकामे होत आहेत. वॉटर स्पोर्ट्ससोबत तेथे टेंट सिटी तयार केली जात आहे. अराइव्हल प्लाझा, सायकल ट्रक, इव्हेंट ग्राउंड, एम्फिथिएटर, फोर्ट रिस्टोरेशन, लाइफ गार्ड टॉवर समवेत 55 प्रकारची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.









