लडाख-गुऊंगमधील डोंगराळ भागात उभारणी
वृत्तसंस्था /श्रीनगर
भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच लडाखमध्ये एक नवीन घटना समोर आली आहे. चिनी सैन्याने चुशूलच्या बफर झोनमध्ये म्हणजेच तटस्थ भागात चार तंबू ठोकल्याचा प्रकार उघड झाला होता. ही घटना पूर्व लडाखमधील गुऊंग हिल्समधील टेबल टॉप भागात निदर्शनास आल्यानंतर भारताने त्यात हस्तक्षेप केला. भारताच्या तीव्र विरोधानंतर चीनच्या सैनिकांनी तंबू काढून सदर भागातून पळ काढला आहे. भारतीय लष्कर चीनच्या हालचालींवर कडक नजर ठेऊन आहे. याचदरम्यान लडाखमधील गुरुंग भागात डोंगरमाथ्यावर तंबू थाटल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. हा प्रकार सैनिकांनी वरिष्ठांना कळवल्यानंतर त्याबाबत तातडीने पावले उचलण्यात आली. दोन दिवसांपूर्वी चिनी सैन्याने चुशूलच्या बफर झोनमध्ये चार तंबू ठोकले होते, असे पूर्व लडाखमधील चुशूल येथील कौन्सिलर स्टॅनझीन यांनी सांगितले. यापूर्वी 2020 च्या एप्रिल-मे मध्ये, चीनने पूर्व लडाखच्या सीमावर्ती भागात व्यायामाच्या बहाण्याने सैन्य जमा केले होते. यानंतर अनेक ठिकाणी घुसखोरीच्या घटना घडल्या. भारत सरकारनेही या भागात चीनइतकेच सैन्य तैनात केले होते.









