अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांवर फटका
सोलापूर : अतिवृष्टी, महापुरानंतर आता अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. यामुळे काढणीला आलेला कांदा कुजू लागला आहे. छाटणी होऊन घह तयारीत असलेल्या द्राक्ष बागा या सहू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढू लागली आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप हंगामातील बहुतांश पिके वाया गेले आहेत.
त्यातूनकाही उरली सुरली पिके हाती लागेल अशी आशा होती. परंतु ऐन दिवाळीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान सुरु झाले आहे.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने जमिनीत पाणी साचल्याने द्राक्षाची पांढरी मुळे काम केली नाहीत. त्यामुळे छाटणीवर परिणाम झाला. परिणाम छाटणी खर्च वाढला. छाटणी पूर्ण संपताच आता द्राक्ष घड तयार होत आहे. परंतु पावसाचे पाणी साचून राहत असल्याने घड सहून जात आहेत. घडावरील पाणी कमी करण्यासाठी हवेचा मारा करून घड कोरडा करावा लागत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचा खर्च वाढला आहे.
खरीप आणि लेट खरीप हंगामातील कांदा आता काढणीला आला आहे. काढणीला आलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणल्यानंतर कवडीमोल दर मिळत आहे. तर काढणी न करता कांदा शेतातच ठेवल्यास कांदा कुजून जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला गेला आहे. अतिवृष्टीने शेतात पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उरले सुरलेले तूर फुलोरा अवस्थेत असून, अवकाळी पावसाच्या माराने फुल गळती झाली आहे. तर दुसरीकडे शेंगा अवस्थेत असलेल्या तुरीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे.
ऊस हंगामाला बसणार फटका
यंदा सीना, भीमा नदीकाठी पुरामुळे उसाचे चिपाडे बनले आहेत. १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार आहे. आता अवकाळी पावसांमुळे रस्ते पुन्हा चिखलमय बनले आहेत. उसाच्या फडात पाणी साचून राहत असल्याने ऊस तोडणीवर परिणाम होऊन गाळप हंगामाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








