नगरसेविकेच्या मुलाची विरोधी गटनेत्याच्या खुर्चीपर्यंत मजल
बेळगाव : महानगरपालिकेतील शिष्टाचाराला हरताळ फासण्याचे प्रकार सुरूच आहेत. विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांच्या कक्षातील खुर्चीवर एका नगरसेविकेचा मुलगा बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने महापालिका वर्तुळात सध्या या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधी गटातील नगरसेविका फत्तेखान यांचा मुलगा इम्रान फत्तेखानने गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या कामकाजात नाक खुपसण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच अशोकनगर येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात ई-आस्थी अंतर्गत ए व बी खात्यांची नोंदणी करून घेण्यासाठी विलंब केला जात असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
त्यानंतर नगरसेवकांनी महसूल खात्यातील भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे धरल्याने काही महसूल निरीक्षकांची मनपा आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली होती. यानंतर आता इम्रान फत्तेखान हा एका वेगळ्या कारनाम्यामुळे चर्चेत आला आहे. सत्ताधारी गटनेत्याप्रमाणेच विरोधी गटनेत्यालादेखील महापालिकेत तितकेच महत्त्व आहे. विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांचा महापालिकेत कक्ष आहे. त्या ठिकाणी त्यांना टेबल, खुर्ची उपलब्ध करून देण्यासह त्यावर नामफलकदेखील आहे. त्यांना भेटावयास येणाऱ्या नागरिकांसाठी कक्षात स्वतंत्र खुर्च्या देखील उपलब्ध आहेत. मात्र, विरोधी गटातील नगरसेविका फत्तेखान यांचा मुलगा चक्क विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे महापालिकेत या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीत विरोधी गटनेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे हे वागणे आहे.









