महापौर-उपमहापौर निवडणुकीची मनपाकडून तयारी
बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे सभागृहाच्या स्वच्छतेचे आणि साहित्याच्या दुरुस्तीचे काम कौन्सिल विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. आता लवकरच हे सभागृह नगरसेवकांनी गजबजणार आहे. 28 फेब्रुवारी 2019 रोजी महापालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू होती. सप्टेंबर 2021 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. पण महापौर-उपमहापौर आरक्षणाचा वाद निर्माण झाल्याने सव्वावर्षानंतरही महापालिका सभागृह अस्तित्वात आले नाही. महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नसल्याने सभागृहाची स्थापना रखडली होती. तब्बल चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार असून लोकनियुक्त सभागृहाची स्थापना होणार आहे. मात्र चार वर्षांच्या कालावधीत सभागृहाचा वापर विविध बैठकांसाठी व कार्यक्रमांसाठी केला जात होता. मात्र प्रोटोकॉलप्रमाणे सभागृहात शिस्त राखणे आवश्यक आहे. महापौर-उपमहापौर आणि नगरसेवकांची आसन व्यवस्था ठरलेली असते.
त्यामुळे त्यांची आसन व्यवस्था करण्यासह सभागृहातील खुर्च्या-टेबलची दुरुस्ती केली जात आहे. तसेच रंगरंगोटी करून स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपली आहे. महापौर पद सामान्य महिलेसाठी तर उपमहापौर पद ओबीसी ‘ब’ महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे या पदावर कोण विराजमान होणार? यावर चर्चा सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आवश्यक तयारी चालविली आहे. सभागृहातील दुरुस्ती कामाबरोबरच महापौर-उपमहापौर कक्ष सज्ज करण्यात येत आहेत. सत्ताधारी-विरोधी गटासाठी आणि स्थायी समिती चेअरमन कक्षाची व्यवस्था कार्यालय आवारात उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये केली जाणार आहे. याची तयारदेखील महापालिकेने चालविली आहे. तसेच निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी कागदपत्र व अन्य व्यवस्था करण्याचे काम कौन्सिल विभागाने सुरू केले आहे.









