‘आप’कडून निवडणूक लढविण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ ईटानगर
दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने एक मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाला अलिकडेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आम आदमी पक्षाने आता अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
अरुणाचल प्रदेशात एकूण 60 विधानसभा मतदारसंघ आहेत. पक्ष सर्व विधानसभा मतदारसंघ तसेच दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहे. राज्यात सत्तेवर आल्यावर आम्ही लोकांना मोफत पाणी, वीज, 10 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळवून देऊ असा दावा आप प्रदेश महासचिव टोको निकम यांनी केला आहे.
सत्तेवर आल्यावर वादग्रस्त अरुणाचल प्रदेश अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियम 2014 आणि अरुणाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य अधिनियम 1978 रद्द करू असे आश्वासन आम आदमी पक्षाकडून देण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियम रद्द करण्याची मागणी राज्यातील अनेक संघटनांकडून केली जात आहे. दोन राज्यांमध्ये सरकार असलेल्या आम आदमी पक्षाचे गुजरातमध्ये 5 आमदार आहेत.
चालू वर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच पक्ष मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत देखील उमेदवार उभे करणार आहे. अशा स्थितीत आम आदमी पक्षाने ईशान्येतील अरुणाचल प्रदेशच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.









