पुणे : चांगल्या प्रकारे यशस्वी अभिनेता व्हावे यादृष्टीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात मी काम केले आणि कोट्यवधी रुपयांची चित्रपटांची उलाढाल केली. मात्र, कारोनापूर्व काळात चित्रपटाची दुनिया मोठी वाटत होती ती दोन वर्षांच्या मदत कार्यानंतरच्या काळात छोटी वाटू लागली आहे. कोणत्याही कॅमेरा, लाईट शिवाय केवळ ॲक्शन भूमिकेत काम करून अज्ञात सर्वसामान्य लोकांशी जोडले जाणे आणि त्यांच्या समस्याचे निराकरण करणे हीच खरी दुनिया आहे, असे मत अभिनेता सोनू सूद (sonu sood) याने व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित ‘जीतो कनेक्ट २०२२’ मध्ये तो बोलत होता. सोनू सूद म्हणाला, मी मूळचा पंजाब राज्यातील रहिवासी असून शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलो. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होण्याकरिता पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु नागपूर येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने त्याठिकाणी शिक्षण पूर्ण केले. कोविड काळात केलेल्या मदतीबाबतचा अनुभव सांगताना त्याने आपल्या प्राध्यापिका असलेल्या आईने सांगितले होते की, तुझ्या हाताची मूठ उघडी कर ती कोणाच्या तरी कामास येऊ शकते. कोविड सुरू झाला त्यावेळी मला नेमके माहीत नव्हते मी कशाप्रकारे लोकांना बस, रेल्वे, विमान यांनी पाठवू शकेल. लोकांना अन्न कसे पुरवू शकेल मात्र, मी सुरुवात केली आणि काम वाढत गेले. कोचीनमध्ये कोरोना काळात अडकलेल्या १७९ मुलींना कोचीन ते भुवनेश्वर विमानाने घेवून जाऊन त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहचवू शकलो ही माझ्यासाठी प्रोत्साहित करणारी गोष्ट होती.
कोरोना काळात माझ्या सोबत असणाऱ्या लोकांना मी गरजू पेशंटच्या समन्वयासाठी ऑनलाईन जोडले आणि त्याचा उपयोग झाला. माझ्या ट्विटर खात्यावर अनेक जणांचे मेसेज येत होते आणि त्यांना मी वैयक्तिक रिप्लाय करत होतो. मोठ्या अपेक्षेने लोक तुमच्याकडे येत असतात अशावेळी त्यांना नवीन ‘आशा आणि प्रयत्न’ देणे आवश्यक आहे. प्रयत्न करत गेल्यास आपोआप मार्ग मिळतो. तुमच्याकडे किती पैसे आहे हे महत्वाचे नसून तुम्ही कशाप्रकारे मदतीसाठी प्रयत्नशील राहता हे महत्वपूर्ण आहे.
यावेळी मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, उद्योजक नरेंद्र बलदोटा, उद्योजक प्रकाश धारीवाल, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एन एस उमरणी आदी उपस्थित होते.








