क्षी जिनपिंग यांच्या राजवटीत गायब होताहेत नेते
वृत्तसंस्था/ जिनपिंग
चीनमध्ये विदेशमंत्र्यांनंतर आता संरक्षणमंत्री ली शांगफू देखील गायब झाले आहेत. यापूर्वी चीनच्या सैन्याच्या शक्तिशाली रॉकेट फोर्सचे जनरल देखील गायब झाले होते. जपानमधील अमेरिकेचे राजदूत रेहम इमॅन्युएल यांनी चीनमधील वाढत्या राजकीय अस्थिरतेकडे लक्ष वेधले आहे. मागील दोन आठवड्यांपासून चीनचे संरक्षणमंत्री नजरेत पडलेले नाहीत. ‘बेरोजगारी’च्या या शर्यतीला कोण जिंकणार? चीनचा युवा का क्षी जिनपिंग यांची कॅबिनेट’ असे इमॅन्युएल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. चिनी संरक्षण मंत्री सार्वजनिक स्वरुपात दिसून न आल्याने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
चिनी संरक्षणमंत्री ली शांगफू यांना 29 ऑगस्टपासून पाहिले गेलेले नाही. ली शांगफू यांनी चीन-आफ्रिका शांतता अन् सुरक्षा फोरमला संबोधित केले होते. या परिषदेपूर्वी चिनी संरक्षणमंत्री एका सुरक्षा संमेलनात भाग घेण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियन नेत्यांसोबतच्या बैठकीदरम्यान शांगफू यांनी ‘चीनची कोंडी करण्यासाठी तैवानचा वापर करण्यावरून’ अमेरिकेवर निशाणा साधला होता.
संरक्षणमंत्री शांगफू यांचा ठावठिकाणा नसताना चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देशाच्या सैन्यात एकता अन् स्थिरतेचे आवाहन केले आहे. याचबरोबर त्यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. ली शांगफू यांना मार्च महिन्यात संरक्षणमंत्रिपदी नियुक्त करण्यात आले होते. जुलै महिन्यात जिनपिंग यांनी विदेश मंत्री किन गांग यांना पदावरून हटविले होते. तत्पूर्वी किन गांग हे दोन महिन्यांपर्यंत बेपत्ता राहिले होते आणि त्यानंतर त्यांच्या जागी वांग यी यांची विदेशमंत्री म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली होती.
किंग गांग यांना हटविल्यावर जिनपिंग यांनी रॉकेट फोर्सचे जनरल ली यूचाओ आणि लियू गुआंगबिन यांनाही बडतर्फ केले होते. विशेष म्हणजे या तिघांनाही जिनपिंग यांच्या कॅबिनेटचे थेट नियुक्त केले होते. या तिघांनाही पदावरून हटविण्यात आल्याने जिनपिंग यांची मोठी फजिती झाली होती. दुसरीकडे देशाचे मंत्री गायब होत असल्याने चीन आणि जिनपिंग यांच्या राजवटीबद्दल संशय वाढत चालला आहे.









