इस्रो आता करणार सूर्याचा अभ्यास : ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या दिशेने झेपावणार
वृत्तसंस्था /बेंगळूर, नवी दिल्ली
भारताची नजर आता सूर्याकडे आहे. चांद्रयान-3 चंद्रावर पाठवल्यानंतर आता इस्रोकडून सूर्य मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे. बेंगळूर येथे तयार करण्यात आलेला ‘आदित्य एल-1’ उपग्रह नुकताच श्रीहरिकोटा येथे पाठवण्यात आला असून इस्रोने सोमवारी त्याची छायाचित्रे जारी केली. ‘आदित्य एल-1’ नावाची वेधशाळा अवकाशात पाठवण्यात येणार आहे. लोक ‘आदित्य एल-1’ला ‘सूर्ययान’ असेही म्हणत आहेत. त्याची प्रक्षेपण तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते लॉन्च केले जाऊ शकते, अशी शक्यता इस्रोमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली जात आहे.
‘आदित्य एल-1’ ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. ‘आदित्य एल-1’ अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एल-1 कक्षेत स्थापित केले जाणार आहे. एल-1 हा सूर्य आणि पृथ्वी प्रणालीमधील पहिला लॅग्रेंज पॉईंट आहे. भारताचे ‘आदित्य एल-1’ हे ‘सूर्ययान’ पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी अंतरावर तैनात असेल. ते प्रत्यक्षात सूर्यावर दाखल होणार नसले तरी दूरवरून सूर्याचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेशी संबंधित सर्वात महत्त्वाचा ‘व्हिजिबल लाइन एमिशन कोरोनाग्राफ (व्हीएलईसी) हा पेलोड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सने बनवला आहे. भारतीय ‘सूर्ययान’मध्ये सात पेलोड असून अन्य सहा पेलोड इस्रो आणि इतर संस्थांनी बनवले आहेत. ‘आदित्य एल-1’ उपग्रह सतीश धवन अंतराळ केंद्रात दाखल झाला आहे. हा उपग्रह आता रॉकेटमध्ये स्थापित केला जाईल. लवकरच देशवासियांना ‘आदित्य एल-1’ मोहिमेच्या शुभारंभाची बातमी मिळू शकेल.
चार महिन्यांनी ‘एल-1’वर पोहोचणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करणार असून ‘आदित्य एल-1’ हे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले भारतीय मिशन असेल. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल-1 अंतराळयान प्रक्षेपित केले जाईल. हे यान प्रक्षेपणानंतर चार महिन्यांनी सूर्य-पृथ्वी प्रणालीतील लॅग्रेंज पॉईंट-1 (एल-1) वर पोहोचेल. या बिंदूवर ग्रहणाचा प्रभाव पडत नसल्यामुळे सूर्याचा अभ्यास येथून सहज करता येतो. एल-1 बिंदू पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.









