वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इस्रो देशाची पहिली सूर्य मोहीम ‘आदित्य एल-2’च्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. सूर्याचे अध्ययन करण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या यानाच्या सर्व पेलोडांचे (उपकरण) परीक्षण पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच याचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे. ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. सर्वकाही सुरळीत राहिल्यास 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 च्या लँडिंगंनतर किंवा सप्टेंबरच्या प्रारंभी आदित्य एल-1 अंतराळाच्या दिशेने झेपावू शकते. आदित्य एल-1 द्वारे सोलर कोरोनल इजेक्शनचे (सूर्यावरील वायुमंडळातून निघणाऱ्या ज्वाला) विश्लेषण केले जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे. या ज्वाला आमचे कम्युनिकेशन नेटवर्क किंवा पृथ्वीवर होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक हालचालींना प्रभावित करत असतात. पृथ्वीवर ऊर्जेचा एकमात्र स्रोत सूर्य असून तो आमच्या सौरमंडळातील सर्वात नजीकचा तारा आहे. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास 8 मिनिटांचा कालावधी लागतो. उर्वरित तारे अत्यंत अधिक अंतरावर असल्याने त्यांची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास 4 वर्षे लागतात. आदित्य एल-1 एलएमव्ही एम-3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित होणार आहे. अंडाकृती कक्षेत हे यान वाटचाल करणार आहे. 15 लाख किलोमीटर अंतरावर एल-1 च्या समीप होलो ऑर्बिटमध्ये हे यान स्थापित होणार आहे.
अनेक देशांकडून मोहीम
सूर्याबद्दल अध्ययन करण्यासाठी अमेरिका, जर्मनी, युरोपीय अंतराळ संस्थेने एकूण 22 मोहिमा प्रक्षेपित केल्या आहेत. सर्वाधिक मोहिमा अमेरिकेच्या नासाकडून पार पडल्या आहेत. नासाने पहिली सूर्य मोहीम पायोनियर-5 ही 1960 मध्ये राबविली होती. जर्मनीने स्वत:ची पहिली सूर्य मोहीम 1974 मध्ये नासासोबत मिळून प्रक्षेपित केली होती. युरोपीय अंतराळ संस्थेने स्वत:ची पहिली मोहीम नासासोबत मिळून 1994 मध्ये प्रक्षेपित केली होती. नासाकडून आणखी काही मोहिमा प्रस्तावित आहेत.
आदित्य एल-1 मध्ये 7 उपकरणांचा समावेश
आदित्य एल-1 मध्ये एकूण सात उपकरणे (व्हीईएलसी, सूट, एएसपीईक्स, पापा, सोलेक्स, हेल10एस आणि मॅग्नेटोमीटर) असणार आहेत. यातील 4 थेट सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येणाऱ्या ऊर्जित कणांचे विश्लेषण करतील. हे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात कसे अडकून पडतात याचा शोध या उपकरणांकडून लावला जाणार आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर कशाप्रकारे कोरोनल इजेक्शन होतेय आणि त्याची तीव्रता किती हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न होईल. यामुळे सूर्यावरील हालचालींविषयी पूर्वानुमान व्यक्त करण्याची क्षमता विकसित होऊ शकते.









