राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पेडणे भाजपतर्फे सत्कार
पेडणे : सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केवळ भाजपा मध्ये जे स्थान मिळतं ते इतर पक्षात मिळत नाही. मंत्र्याला सुद्धा जेवढा सन्मान मिळत नाही. तेवढा मान भाजप अध्यक्ष झाल्यानंतर मिळाला. असे उद्गार राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना काढले. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व इतर हितचिंतकातर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल कोरगाव पंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, हरमल जि. पं. सदस्य रंगनाथ कलशावकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, कोरगाव सरपंच समील भाटलेकर, उपसरपंच कल्पिता कलशावकर, पंच लौकिक शेट्यो, पंच अब्दुल नाईक, पंच सदस्य अनुराधा कोरगावकर, सदस्य नीता नर्से, पंच दिवाकर जाधव, पंच उमेश च्यारी आदी उपस्थित होते. आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते खासदार सदानंद तानावडे यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि लामण दिवा भेट देऊन सत्कार केला.
खासदार सदानंद तानावडे यांनी पुढे बोलताना सांगितले की ज्या ज्या वेळी पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी नि:स्वार्थी भावनेने स्वीकारली आणि कार्य करत गेलो, फळाची अपेक्षा ठेवली नाही, पक्षाने खूप काही दिले. पक्षाने आपल्याला सरचिटणीस, भाजप अध्यक्ष आणि खासदार अशा पदापर्यंत पोहोचवले. याचे पूर्ण श्रेय हे तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांना असल्याचे सदानंद तानावडे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा त्याग केलेला आहे. देशसेवेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. आजपर्यंत आपण कधी चतुर्थी चुकवली नव्हती. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय आहे. म्हणून चतुर्थीच्या काळातही अधिवेशन भरवण्याचं काम केले. नवीन संसद भावनात प्रवेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर होणार असा विश्वास खासदार सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना सांगितले सर्वसामान्य कार्यकर्ता कसा उच्च पदावर पोहोचेल यावर केवळ भारतीय जनता पक्ष ठरू शकतो. पंच आमदार ते खासदार पर्यंत पोहोचलेले खासदार सदानंद तानावडे यांचे योगदान पक्षासाठी मोठे आहे. आत्ता आम्ही पेडणे मतदार संघाचा विकास खासदार ,सरकार यांच्या माध्यमातून करूया असे आवाहन यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. स्वागत प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. पंच लौकिक शेट्यो यांनी आभार मानले.









