पुन्हा दिसल्यास नष्ट करू : जपानचे सरकार
वृत्तसंस्था /टोकियो
अमेरिकेनंतर आता जपानने देखील चीनचा स्पाय बलून स्वत:च्या हवाईक्षेत्रात दिसल्याची पुष्टी दिली आहे. अनेक चिनी स्पाय बलून्सचे आता उपग्रहीय छायाचित्र जारी करण्यात आले आहे. हे चिनी फुगे पूर्व आशियाला ओलांडताना दिसून आले आहेत. उत्तर चीनमधून हे बलून्स लाँच करण्यात आले होते. चिनी बलून्स पुन्हा आमच्या क्षेत्रात दिसून आल्यास त्यांना नष्ट करण्यात येईल असे जपानच्या सरकारने म्हटले आहे. चिनी बलून्स सप्टेंबर 2021 मध्ये जपानमध्ये दिसून आले होते. परंतु पहिल्यांदाच त्यांची छायाचित्रे समोर आली आहेत. जपानचे सरकार अशाप्रकारच्या स्पाय बलून्सच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. गरज भासल्यास देश आणि नागरिकांच्या रक्षणासाठी हे फुगे आकाशातच नष्ट करण्यात येतील. अशाचप्रकारचे चिनी स्पाय बलून्स तैवानच्या क्षेत्रातही दिसून आल्याची माहिती जपानच्या अधिकाऱ्याने दिली आहे. चीन मागील 5 वर्षांपासून अशाप्रकारच्या स्पाय बलून्सचा वापर करत आहे. स्पाय बलून्सचा आकार हा अनेक बसेसइतका असतो आणि यात डाटा संग्रहासाठी उपकरणे जोडलेली असतात अशी माहिती सीआयएचे माजी विश्लेषक जॉन कुल्वर यांनी दिली आहे. अमेरिकेच्या मोंटाना शहरात 2 फेब्रुवारी रोजी चिनी स्पाय बलून दिसून आाल होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने 5 फेब्रुवारी रोजी एफ-22 लढाऊ विमानाद्वारे हा बलून नष्ट केला होता. तसेच याचे अवशेष चीनला परत करण्यास नकार दिला होता. जानेवारी 2022 मध्ये चीनच्या स्पाय बलूनने भारताच्या सैन्यतळाची हेरगिरी केली होती असा दावा अमेरिकेचे संरक्षणतज्ञ एच.आय. सटन यांनी केला होता. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरवरून या स्पाय बलूनने उ•ाण केले होते.









