लाखो रुपये पाण्यात, प्रयत्न अयशस्वी : बिबटय़ा सहीसलामत निसटला
प्रतिनिधी /बेळगाव
सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रप कॅमेरे, श्वान पथक, प्रशिक्षित हत्ती पथक, हनीट्रप आणि शेकडो कर्मचाऱयांच्या अथक प्रयत्नानंतरही बिबटय़ा अखेर मिळाला नाही. श्रम, प्रयत्न, उपाय आणि लाखो रुपये खर्चूनदेखील बिबटय़ा मात्र 30 दिवसांनंतर सहीसलामत रेसकोर्समधून निघून गेला. त्यामुळे वनखात्याच्या शर्थीच्या प्रयत्नांना अपयश आल्याचे समोर आले आहे.
बिबटय़ाच्या शोधासाठी लावलेले टॅप कॅमेरे, श्वान पथक आणि हत्ती पथकासाठी मोठा खर्च केला आहे. शिवाय वनखाते आणि पोलीस कर्मचाऱयांच्या खाण्या-पिण्यासाठीही खर्च आला आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून तज्ञ आणि प्रशिक्षकांना पाचारण करण्यात आले होते. शिवाय अद्याप दोन हत्ती रेसकोर्स परिसरातच तळ ठोकून आहेत. या हत्तींचा खाण्या-पिण्याचा दैनंदिन खर्चदेखील अधिक आहे. त्यामुळे महिनाभरात बिबटय़ाच्या शोधासाठी लाखो रुपये खर्ची पडले आहेत, हे मात्र वास्तव आहे.
5 ऑगस्ट रोजी जाधवनगर परिसरात एकावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. तेव्हापासून वनखात्याने शोधमोहीम हाती घेतली होती. बिबटय़ाला पकडण्यासाठी ट्रप कॅमेरे, श्वान, हत्ती आणि इतर आधुनिक तंत्रांचादेखील वापर झाला. मात्र सारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. दरम्यान तीनवेळा बिबटय़ा नजरेला पडला होता. मात्र वनखात्याच्या हाती लागला नाही. एका बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखाते आणि पोलीस खात्याची सर्व यंत्रणा जुंपण्यात आली होती. शिवाय बाहेरून तज्ञांना आणि प्रशिक्षित कर्मचाऱयांना पाचारण करण्यात आले होते. मात्र हे सारे व्यर्थ ठरले आहे. शिवाय 30 दिवस दहशत माजवून बिबटय़ा मात्र वनखात्याच्या हातातून निसटला आहे.
बिबटय़ासाठी शिमोगा येथील दोन हत्तींना पाचारण करण्यात आले. हत्तींच्या सहकार्याने निशाणा साधण्यासाठी प्रशिक्षकही तैनात करण्यात आले. मात्र याचाही काहीच उपयोग झाला नाही. शिवाय दांडेली, शिमोगा, गदग येथून शेकडो वन कर्मचारीदेखील दाखल झाले होते. शिवाय रेसकोर्स परिसरात चारवेळा कोम्बिंग ऑपरेशन (शोधमोहीम) राबविण्यात आली. याला पोलीस खात्याच्या 200 कर्मचाऱयांचे सहकार्य मिळाले. बिबटय़ाच्या शोधासाठी खर्ची घातलेला लाखो रुपयांचा निधी मात्र वाया गेला आहे.
सारी यंत्रणा रेसकोर्सच्या मैदानात
बिबटय़ासाठी वनखात्याची सारी यंत्रणा रेसकोर्सच्या मैदानात तळ ठोकून होती. बिबटय़ाला कोणत्याही परिस्थितीत जेरबंद करा, अशा सूचना वनमंत्र्यांनी केल्या होत्या. शिवाय वनखात्याचे वरि÷ अधिकारीही बिबटय़ाच्या हालचालींवर नजर ठेवून होते. दरम्यान रेसकोर्सला आमदार व खासदारांनीही भेट देऊन बिबटय़ाला तातडीने जेरबंद करा, अशा सूचना केल्या होत्या. वनखात्यानेही आपली सारी फौज रेसकोर्स मैदानात उतरविली होती. मात्र याचा काहीच उपयोग न होता बिबटय़ा रेसकोर्समधून सहीसलामत बाहेर पडला आहे.
बिबटय़ाच्या शोधासाठी विविध यंत्रणा कामाला
बिबटय़ाच्या शोधासाठी विविध यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे खर्च अपेक्षित आहे. अद्याप एकूण किती खर्च झाला, याची पडताळणी करण्यात आली नाही. मात्र बिबटय़ाच्या शोधासाठी दैनंदिन खर्च अधिक होता. शेकडो कर्मचारी तळ ठोकून होते.
– मल्लिनाथ कुसनाळ (एसीएफ वनखाते)









