राज्यभरात सर्वत्र समाधानकारक पाऊस : पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस शक्य
पणजी : अखेर कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल शुक्रवारी गोव्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला. सायंकाळी उशिरा अणजुणे धरणक्षेत्रातही पाऊस सुरू झाला. सांखळीच्या वाळवंटी नदीमध्ये अद्याप नव्याने प्रवाह सुरू झालेला नाही. फोंडा तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. पणजीतही मध्यम प्रमाणात, परंतु दिवसभरात अधूनमधून पाऊस पडला. मडगाव, सांगे, केपे, काणकोण या दक्षिण गोव्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला. उत्तर गोव्यात म्हापसा परिसरात जोरदार पाऊस झाला. आगामी 24 तासांत मुळसधार पाऊस पडेल तसेच पुढील पाच दिवसांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात उशिरानेच पावसाचे आगमन शुक्रवारी रात्री उशिरा झाले. शुक्रवारी सांगे, केपे, काणकोण, वाळपई सत्तरी आदी परिसरात जोरदार पाऊस झाला. पणजीत मध्यरात्री उशिरा सुरू झालेला पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत पडला. मात्र पावसाला तेवढा जोर आलेला नाही. केवळ तापलेली जमीन ओली झाली आणि हवेत थोडा गारवा आला. गोव्यात जूनमध्ये मुसळधार पाऊस पडतो तो अद्याप पणजीत वा आसपासाच्या परिसरात दिसला नाही. सकाळी ताळगाव भागात मुसळधार पाऊस पडून गेला. यंदा पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचीही त्रेधातिरपिट उडाली आहे. धरणे बरीचशी कोरडी पडली आहेत. एवढी बिकट अवस्था गोव्यात कधीही झाली नव्हती. त्यामुळेच शुक्रवारी दिवसभर गोव्यात अधूनमधून जो पाऊस पडला त्याने जनतेला दिलासा मिळाला. उत्तर गोव्यात डिचोली तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट आलेले आहे. त्याभागात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सांखळीच्या वाळवंटी नदीत प्रवाह सुरू होण्याकरीता महाराष्ट्रातील विर्डी व इतर परिसरात मुसळधार पाऊस पडणे आवश्यक आहे. अणजुणे धरण ओलीत क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळी पावसाला प्रारंभ झाला. परंतु त्या पावासाला जोर नव्हता.
सांगे, मुरगाव, काणकोणात पावसाचा जोर
गेल्या 24 तासांमध्ये सांगे परिसरात मुसळधार पाऊस पडला. सांगेमध्ये 2.5 इंच, मुरगावात 2 इंच, मडगाव व फेंडामध्ये प्रत्येकी सव्वा इंच पाऊस झाला. दाबोळीत 1.5 इंच एवढा पाऊस पडला. राजधानी पणजीत पाऊण इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा व केपे येथे प्रत्येकी अर्धा इंच, तर सांखळी व जुने गोवे येथे 1 सें.मी. पेक्षाही कमी पावसांची नोंद झाली. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार, दि. 27 जूनपर्यंत गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. पणजीत दिवसभरात अधूनमधून पाऊस पडला. परंतु पावसाला जोर नव्हता. तसेच अणजुणे केरी सत्तरी परिसरात पावसाला अद्याप जोर आलेला नाही. केवळ मध्यम पावसाची रिपरिप सायंकाळी सुरू झाली. पावसाचा जोर वाढला तर डिचोली तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल, कारण केरी सत्तरीहून वाहणाऱ्या वाळवंटीचा प्रवाह ठप्प झालेला आहे आणि पाण्याची भीषण समस्याही आवासून उभी आहे.









