ज्यावेळी विश्वचषकासारखी स्पर्धा आपल्याच मैदानात होते त्यावेळी प्रेक्षकांचे दडपण असणं साहजिकच आहे. याच चाहत्यांमुळे खेळाडूंना स्फुरण चढतं. या सामन्या अगोदर भारतीय संघ फलंदाजीत व गोलंदाजीत पूर्णता फॉर्ममध्ये होता. अपेक्षांचे जे ओझं असतं ते कधी कधी संकट वाटतं, परंतु या संकटांचं संधीत जो संघ रूपांतर करतो तोच खरा बाजीगर असतो. सलग आठवेळा विजय मिळवत भारतीय संघाने आम्हीच बाजीगर आहोत हे आज पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
हा सामना सुरु होण्याअगोदर मला शोले चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या हातात असणाऱ्या नाण्याची आठवण झाली. त्या नाण्याला दोन्ही बाजूने एकच बाजू होती. मी मनातल्या मनात असं म्हटलं की आज नियतीने जादू करत मॅच रेफ्रीच्या हातात त्या प्रकारचे नाणं द्यावे आणि रोहितने हेड (छापा) म्हणत नाणेफेक जिंकावी आणि बघता बघता घडलंही तसंच. असो नाण्यावर गोलंदाजी करणे म्हणजे काय हे जसप्रीत बूमराह आणि कुलदीप यादव यांनी दाखवून दिले.
क्रिकेट विश्वात चायनामन गोलंदाज म्हणून पॉल अॅडम्सकडे फार आदराने बघितलं जातं. आज कुलदीप यादव त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला. दोन बाद 155 वरुन सर्वबाद 191 ही एक प्रकारे पाकिस्तानसाठी हाराकीरी होती. बाबर आणि रिजवान यांच्या चांगल्या फलंदाजीनंतरही पाकिस्तानचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. काल परवा शोएब अख्तर म्हणाला होता की आमच्याकडे गमावण्यासारखी काहीच नाही आणि हे म्हणणं काल त्याने खरं करून दाखवले. ज्येष्ठ हिंदी क्रिकेट समालोचक सुशील दोषी यांच्या शब्दात सांगायचं झालं तर जे स्वप्नात दिसत नाही ते क्रिकेटमध्ये नेहमी होतं. बघता बघता नेमकं काल तेच घडलं.
या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्माने पहिल्या 10 षटकात आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची हवा काढून घेतली. अफगाणिस्तानविरुद्ध शतकानंतर आज ज्या पद्धतीने रोहितने पाकिस्तानविरुद्ध 86 धावांची जी खेळी केली, त्या खेळीला सलाम. 140 कोटी भारतीयांचे दडपण झुगारत रोहितची पाकविरुद्ध ही खेळी भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदासाठी यजमान भारत प्रबळ दावेदारमध्ये का गणला जातो आहे, हे पहिल्या तीन विजयांनी दाखवून दिले.
आपल्या आयुष्यात काही घटनांमुळे जो आनंद मिळतो त्याचे मोजमाप पैशात होत नाही. कालचा विजयाचा आनंद त्यापैकी एक होता. सरते शेवटी मी एवढंच म्हणेन बाप बाप होता आहे, बेटा बेटा… पुनश्च एकदा भारतीय संघाचे अभिनंदन.









