रामदुर्ग तालुक्यातील भ्रष्टाचार प्रकरण
बेळगाव : जिल्हा पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात रामदुर्ग तालुक्यातील समाजसेवक श्रीनिवासगौड पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या विनवणीवरून शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेतले. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले. रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर व मुद्देनूर या ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये रोजगार हमी योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, रामदुर्ग तालुक्यातील इतर ग्राम पंचायतीमध्येही 28 कोटींचा गैरकारभार झाल्याचे लेखा परिक्षणातून निदर्शनास आले आहे. याबाबतही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत समाजसेवक श्रीनिवासगौड गेल्या आठ दिवसापासून जिल्हा पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिवसरात्र धरणे आंदोलन हाती घेतले होते.
याची दखल घेऊन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भ्रष्टाचार केलेल्या ग्राम पंचायतीमध्ये लोकप्रतिनिधींच्या मालमत्तांवर बोजा चढवून कारवाई केली. तर यामध्ये सहभागी असणाऱ्या ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काहीजणांकडून गैरकारभार झालेली रक्कम वसूल करण्यात आली आहे. अशी कारवाई झाली असतानाही आंदोलन सुरुच होते. यावरून जिल्हा पंचायतीमध्ये इतर अधिकाऱ्यांकडून आंदोलकांचे मन वळवून आंदोलन मागे घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र याचा उपयोग झाला नाही. अखेर शेतकरी संघटनेचा पुढाकार व जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता आंदोलक श्रीनिवासगौड यांना पटवून देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले.









