कोल्हापूर :
श्रावणातील अंगारकी चतुर्थी दहा वर्षातून आली आहे. त्यामुळे ओढयावरील गणपतीसह सर्वच मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. पहाटे चार वाजता महाभिषेक घातला. त्यानंतर सकाळी पावनेसहा वाजता अभिषेकाची तर सहा वाजता नियमित आरती करण्यात आली.
दुपारी बाराच्या आरतीनंतर खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. अनेक भाविकांनी मोदकाचा नैवद्य गणपती चरणी अर्पण केला. काही भाविकांकडून रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावणात दहा वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आली आहे. यानंतर जानेवारी 2026 ला अंगारकी येणार आहे. मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून ओढयावरील गणपती मंदिरात भाविकांनी अभिषेक घालण्यासाठी गर्दी केली होती. येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुशकाच्या रथात बसून गणपती स्वर्गातून पृथ्वीवर येतो आहे. अशा रूपात ओढयावरील गणपतीची आलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा पुजारी सागर भोरे, आकाश गुरव, योगेश भोरे, केतन पायमल, विश्वराज ढेरे यांनी बांधली. मंदिराची सजावट पानाफुलांनी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यंदा वर्षभरातील एकच अंगारकी आल्याने भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांनी सकाळपासूनच नारळ, फुलांसह मोदकाचा नैवद्य गणपतीला अर्पण केला. दर्शन घेत आपल्या कुटुंबात सुख-समृध्दी नांदू दे अशी आराधना गणपतीचरणी लीन होत भाविकांनी केली. ओढयावरील गणपती, अंबाबाई मंदिरातील गणपती, खडीचा गणपती, चांदीचा गणपती, पितळी गणपती, नवसाचा गणपती यासह शहरातील अन्य मंदिरात दिवसभर पूजा आर्चा सुरू होती. सकाण खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, केळी तर सायंकाळी अनेक भाविकांनी मोदक, खिचडी भात आणि लाप्शीच्या प्रसादाचे वाटप केले. रांगेत उभा असलेल्या भाविकांनी गणपती बाप्पा मोरया असा जयजयकार केला. मंदिरातील भक्तीमय वातावरणात भाविक तल्लीन झाले होते. भाविकांनीही विधीवत पूजा करीत गणपती बाप्पाची आराधना केली. ओढ्यावरील गणपती मंदिरात रात्री सातच्या आरतीनंतर अमोल राबाडे यांचे बासरी वादन व गायनाचा कार्यक्रम झाला.
- पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री
श्रावणातील अंगारकी असल्याने भाविकांनी गणपतीची विधीवत पूजा केली. त्यामुळे सर्वच गणपती मंदिराच्या बाहेर पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नारळ, केळी, दुर्वा, आगाडा, जास्वंदीचे फुल, उदबत्ती, यासह अन्य पूजेच्या साहित्याची मोठया प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले.
- दर्शन रांगेसह स्क्रिनची व्यवस्था
अंगारकी असल्याने शहरातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ओढयावरील गणपती मंदिरात दर्शन रांगेसह मंदिरात ऑनलाईन दर्शनासाठी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिराबाहेर पोलीसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.








