तुडये प्रतिनिधी
हाजगोळी (ता. चंदगड) येथे तिलारी धरणात शनिवारी सायंकाळी बुडालेल्या दोन सख्या भावांचे मृतदेह शोधण्यास एचइआरएफ रेस्क्यू टिमला तब्बल आठ तासाच्या शोध मोहिमेनंतर यश आले.
या परिसरात कुटुंबीयांसह शनिवारी फिरण्यास आलेल्या रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि त्याचा लहान भाऊ मुस्ताफा अल्ताफ खान (वय 12) हे दोघे बुडाले होते. चंदगड रेस्क्यू टिमकडून रात्री 8.30 पर्यंत मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अंधार आणि पावसामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून चंदगड रेस्क्यू टिमचे एकनाथ म्हाडगुत आणि श्रीपाद सामंत यांनी पाण्यात मृतदेह शोधले. सकाळी दहापासून एचईआरई रेस्क्यू टिमने शोध मोहीम सुरू केली. पाण्यात पॅमेऱ्याद्वारे मृतदेह शोधण्याचे काम श्रीपाद सामंत आणि स्वीमर पदमप्रसाद हुल्ली यांनी तब्बल आठ तास केले. दुपारी 2.45 वाजता रेहान याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर सव्वातीन तासाच्या शोधानंतर सहा वाजता मुस्ताफा याचा मृतदेह रेस्क्यू टिमच्या हाती लागला. दोन्ही मृतदेहांना पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सकाळपासूनच पॅम्प बेळगाव येथील कुटुंबीय, मित्रमंडळी व तुडये-हाजगोळी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक निरीक्षक अंकुश करांडे, सहाय्यक निरीक्षक अर्जुन जाधव, पोलीस हवालदार रामदास किल्लेदार, भदरगे हे दुर्घटनास्थळी थांबून होते. चदंगड रेस्क्यू टिमचे एकनाथ म्हाडगुत, श्रीपाद सामंत, विशाल परब, अविनाश गिलबिले, एचईआरएफचे प्रिसीडंट बसवराज हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पदमप्रसाद हुल्ली, अभिषेक येळळूर, राजू टक्केकर, संतोष दरेकर, विशाल पाटील यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.
पाण्यात उतरणे ठरले जीव घेणे
तिलारी धरणाच्या या ठिकाणी एक-दोन फूट अंतरातच 20 ते 30 फूट खोल पाणी आहे. रेहान आणि मुस्ताफा कमी पाण्यात खेळत होते. यावेळी वडील अल्ताफ हे पाण्यात बुडताना पाहून दोन्ही मुले घाबरून वडिलांच्या बाजूला जाताना खोल पाण्यात बुडाली. यावेळी अल्ताफ हाही बुडत होता. त्याला पत्नीने मोठ्या धाडसाने आपली ओढणी टाकत पतीला बाहेर काढण्यात यशस्वी ठरल्या. मात्र पोटच्या दोन्ही मुलांना वाचविण्यास त्या अपयशी ठरल्या. दिवसभर शोकाकूल वातावरणात दुर्घटनास्थळी हे कुटुंब शोक व्यक्त करताना प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत होता. शोध मोहिमे दरम्यान पावसानेही हजेरी लावल्याने व्यत्यय आला. दोन्ही मृतदेह चंदगड ग्रामीण रुग्णालयाकडे शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.