३५ वर्षांनंतर सरकारी अधिकृत रस्ता अखेर मोकळा
सावंतवाडी |प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील सरकारी अधिकृत सार्वजनिक रस्ता (होळीचे भाटले ते बांदिवडेवाडीपर्यंत जाणारा मार्ग) अखेर ३५ वर्षांनंतर पूर्णपणे मोकळा झाला. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी तहसीलदार. श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायत धाकोरे यांच्या उपस्थितीत ही कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आली . या कारवाईत जेसीबी आणून अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी तहसीलदार, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, धाकोरे व बांदिवडेवाडी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा ऐतिहासिक निकाल लागला आहे. यावेळी धाकोरे ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. आता रस्ता मोकळा झाल्यानंतर लवकरच डांबरीकरण होऊन पक्का रस्ता उपलब्ध होईल असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.









