16 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अगदी अलीकडेच पेठवडगावात क्रीडांगणासाठी जागा मिळाली
By : संग्राम काटकर
कोल्हापूर : राज्य शासनाकडून क्रीडा धोरणानुसार हातकणंगले तालुका क्रीडा संकुलाला मंजुरी मिळाली. कालांतराने तालुका मोठा असल्याने तीन गावात विविध खेळांची क्रीडांगणे तयार करण्याचे ठरले. त्यानुसार हुपरीमध्ये बहुउद्देशीय हॉल, जीम व चेजिंग रुम उभारली असली तरीही पेठवडगावात क्रीडांगणे करण्यासाठी जागा मिळत नव्हती.
तब्बल 16 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अगदी अलीकडेच पेठवडगावात क्रीडांगणासाठी जागा मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जागेचा सातबारा काढला. सध्या तरी जागेचा सातबारा काढला केला तरीही या जागेवर प्रत्यक्ष क्रीडांगणे कधी होणार हे सध्या तरी सांगता येत नाही.
ज्या गावाच्या नावाने तालुका क्रीडा संकुल होत आहे, त्या हातकणंगले गावात क्रीडांगणे करावीत, अशी मागणी आहे. परंतू अद्यापही जागाच उपलब्ध झालेली नाही. या सगळ्या विलंबामुळे पेठवडगाव व हातकणंगले गावातील खेळाडूं मैदानापासून वंचित आहे. त्यांना आणखी किती वर्षे वंचित रहावे लागेल हेही सांगता येत नाही.
आजमितीला आपल्या खेळांच्या सरावासाठी अधिकृत मैदान नसल्याने हुपरी, पेठवडगाव, हातकणंगलेसह विविध गावातील खेळाडूंना शाळा अथवा अन्य मोकळ्या मैदानात सरावासाठी जावे लागत आहे. तेथे अन्य सुविधा नसल्याने येथील खेळाडूंना चांगल्या पद्धतीने सराव करता येणार नाही, हे उघड सत्य आहे.
त्यामुळे हातकणंगले तालुका क्रीडा संकुलचे अध्यक्ष व आमदार अशोकराव माने यांनीच लक्ष घालून क्रीडा संकुल पूर्ण करण्यावर भर देणे गरजेचे झाले असल्याचे सद्यस्थिती आहे. दरम्यान, तीन दशकांपूर्वी हातकणंगलेत सर्व बाजूंनी सुसज्ज असे क्रीडांगण बनवावे, अशी मागणी खेळाडू व क्रीडाप्रेमी करत आहेत.
याकडे गांभिर्याने पाहून तत्कालीन आमदार जयवंतराव आवळे यांनी हातकणंगले गावाच्या नावानेच तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा कऊन मंजुरी मिळवून घेतली. पुढील काहीच वर्षांनी हातकणंगले तालुका क्रीडा संकुलाअंतर्गत हुपरीमध्ये 2 एकर जागा मिळवून त्यावर 27 लाख रुपये खर्चुन इनडोअर खेळांसाठी बहुउद्देशीय हॉल, चेजिंग रुम व व्यायामशाळा उभा केली.
सध्या या सुविधाचे फारसा उपयोग होतो की नाही, सध्या तरी कोणाला सांगता येत नसले तर हुपरीत विविध खेळांची क्रीडांगण करण्यासाठी आणखी पाच जागा शोधावी अशी मागणी खेळाडू करताहेत. गेल्या काही वर्षांपासून हातकणंगले तालुका क्रीडा संकुलाअंतर्गत खुद्द हातकणंगले गावातही क्रीडांगण करावे, अशी मागणी लोक सातत्याने करताना दिसत आहे.
मागणी नुसार क्रीडांगण करायचे झाल्यास हातकणंगले गावातील किमान 9 एकर जागा मिळणे अपेक्षीत आहे. तसेच ही जागा शोधून ती मंजूर करुन घेण्यासाठीचा प्रस्ताव हातकणंगले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणेही आवश्यक आहे. परंतू तो पाठवला जात नाही.
जोपर्यंत जागा शोधून ती जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करुन घेतली जाणार नाही, तोपर्यंत हातकणंगलेतही क्रीडांगण तयार होऊच शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.आता जागा ताब्यात घेण्यापासून ते क्रीडांगणाचा आराखडा बनवणे, कोणकोणत्या खेळांची मैदाने करता येतील, मैदाने करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचे इस्टिमेट तयार करणे, आदी कामांसाठी हातकणंगले तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष, क्रीडा अधिकाऱ्यांची बैठक होणे अपेक्षीत होते. परंतू दोन महिने उलटत आले तरीही बैठक झालेली नाही.
मुळात क्रीडांगण तयार करण्यासाठी लागणारी जागा शोधून ती मिळायला सोळा वर्षे लागली आहेत. त्यामुळे आता या जागेवर क्रीडांगण करण्यासाठीची जास्तीचा उशिर करुन हातकणंगले तालुक्यातील नव्या पिढीतील खेळाडूंचे नुकसान करु नये एवढीच अपेक्षा आहे.
हातकणंगले नगरपरिषेकडे विनंती करणार…
हातकणंगले गावातील लोकांची मागणी सत्यात आणण्यासाठी हातकणंगले गावामधील जागा नगरपरिषदेने लवकरात लवकर उपलब्ध करावी, एवढीच अपेक्षा आहेत. जोपर्यंत जागा मिळणार नाही, तोपर्यंत जागेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सातबारा कऊन त्यावर क्रीडांगण करता येणार नाही. तसेच पेठवडगावात क्रीडांगण करण्यासाठी लवकरात बैठक बोलण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जातील, असे क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगण्यात येत आहे.
16 वर्षानंतर पेठवडगावात जागा मिळाली…
2008-09 साली पेठवडगावात हातकणंगले तालुका क्रीडा संकुलाअंतर्गत क्रीडांगण करण्याचे पक्के केले. तेव्हापासून गेल्या मार्च महिन्यांपर्यंत पेठवडगावात क्रीडांगण करण्यासाठीची जागा शोधण्यापासून ती मंजूर कऊन घेण्यापर्यत ज्या ताकदीने प्रयत्न होणे गरजेचे होते ते झाले नाहीत.
माजी आमदार राजूबाबा आवळे व विद्यमान आमदार डॉ. अशोकराव माने यांनी उशिराने का होईना परंतू मनावर घेऊन दोन महिन्यांपूर्वी पेठवडगावातील 11 एकर जागा क्रीडांगणासाठी निवडली. संबंधीत जागा क्रीडांगणासाठी मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुराव्याला सकारात्मक घेऊन जागेला मंजुरी दिली. जागेचा साताबाराही तयार केला.









