नवी दिल्ली / वृत्तसंस्था
श्रद्धा वालकरच्या हत्येतील मुख्य संशयित आरोपी आफताब पुनावाला याने शुक्रवारी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी शनिवारी या याचिकेवर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल व्हायचे असल्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कारण नाही, असा दावा आफताबच्या वकिलाने केला आहे.
आफताब पुनावाला (28) याने आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. मेहरौली येथील जंगलात सापडलेल्या मृतदेहाच्या हाडांचे नमुने श्रद्धा वालकर हिच्या वडिलांच्या डीएनएशी जुळल्यामुळे तपासाला गती आली आहे. आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 9 डिसेंबर रोजी आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली होती. ही मुदत पुढील आठवडय़ात संपणार आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून सध्या युद्धपातळीवर चौकशी सुरू आहे.









