नागपूर पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून घेतले ताब्यात, विध्वंसक कारवायात सहभाग, ‘लष्कर’साठी भरती एजंट
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी फोनवरून धमकावल्या प्रकरणाला शनिवारी कलाटणी मिळाली असून धमकीचा कॉल करणाऱ्या जयेश पुजारीच्या जबानीवरून नागपूर पोलिसांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अफसर पाशा (वय 35) असे त्याचे नाव असून नागपूर पोलिसांच्या एका पथकाने न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. तो मूळचा चिंतामणी-चिक्कबळ्ळापूर येथील राहणारा आहे.
लष्कर-ए-तय्यबाशी असलेले संबंध व बेंगळूरसह वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या विध्वंसक कारवायांमुळे अफसर पाशाला स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. खंडणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा कारागृहातून धमकावणाऱ्या जयेश पुजारीने आपल्या जबानीत अफसर पाशाचे नाव घेतले आहे.
दि. 14 जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून 100 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना धमकावण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच 21 मार्च रोजी पुन्हा हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून नागपूरला फोन करून खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी जयेश कांता ऊर्फ जयेश पुजारी याला ताब्यात घेऊन नागपूरला नेले आहे.
18 मार्च रोजी जयेशला कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी बेळगावला आलेल्या नागपूर पोलिसांच्या एका पथकाने हिंडलगा कारागृहाला भेट देऊन या घटनेसंबंधी आणखी माहिती गोळा केली असून जयेशच्या जबानीवरून अफसर पाशाला कोठडीत घेण्यात आले आहे. बशीरुद्धीन नूरअहमद ऊर्फ अफसर पाशावर विध्वंसक कृत्य केल्याचे अनेक गुन्हे असून लष्कर-ए-तय्यबासाठी तो भरती करायचा. हिंडलगा कारागृहातून केवळ नागपूरलाच नव्हे तर परदेशातही फोन केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून आता जयेश पुजारीबरोबरच अफसर पाशाचीही चौकशी होणार आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.









