ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील मास्टरमाईंड अफसर पाशा हा बेळगावच्या तुरुंगातून लष्कर-ए-तोयबाचे स्लिपर सेल चालवत होता, अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.
अफसर पाशा हा सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. दहशतवादी नेटवर्क वाढवण्यासाठी तो 2003-2004 मध्ये मध्य नागपुरात वास्तव्याला होता. त्याने यादरम्यान काही लोकांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. बेळगावच्या तुरुंगातून तो लष्कर-ए-तोयबाचा स्लिपर सेल चालवत होता. याच स्लिपर सेलचा एक भाग म्हणून अफसर पाशाच्या सांगण्यावरून जयेश पुजारी याने नितीन गडकरी यांना धमकी दिली होती. पुजारीने दोन वेळा गडकरींना धमकी देत 100 कोटींची खंडणी मागितली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला ताब्यात घेतलं.
दरम्यान, या प्रकरणाचा मास्टरमाईंड अफसर पाशा उर्फ बशीरुद्दीन नूर अहमद याने 2003 मध्ये ढाका बॉम्बस्फोट, 2005 बेंगळूर बॉम्बस्फोट यासह जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला 2006 मध्ये अटक करण्यात आली असून, तो 2014 पासून बेळगावच्या तुरुंगात आहे.