यजमान श्रीलंकेवर 6 गडी राखून विजय : सामनावीर इब्राहिम झद्रान, रेहमत शाहची अर्धशतके
वृत्तसंस्था/ हंबनटोटा
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने पहिल्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 269 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान अफगाण संघाने 46.5 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या मलिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
प्रारंभी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना अफगाण गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव 268 धावांवर संपुष्टात आणला. लंकच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर दिमुथ करुणारत्ने 4 धावा काढून बाद झाला. तर कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, निशंका यांनीही निराशा केल्यामुळे लंकेची 4 बाद 84 अशी स्थिती झाली होती. या बिकट स्थितीत असालेंका व धनजंय डी सिल्वा यांनी शानदार अर्धशतके झळकावत लंकेच्या डावाला आकार दिला. असालेंकाने सर्वाधिक 95 चेंडूत 91 धावा केल्या. डी सिल्वाने 59 चेंडूत 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे लंकेचा डाव 50 षटकांत 268 धावांवर आटोपला.
लंकेने विजयासाठी दिलेले 269 धावांचे आव्हान अफगाण संघाने 46.5 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. सुरुवातीला सलामीवीर रेहमतउल्लाह 14 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र इब्राहिम झद्रन व रेहमत शाह यांनी दुसऱ्या गड्यासाठी 146 धावांची भागीदारी करत अफगाणच्या विजयाचा पाया रचला. इब्राहिमने सर्वाधिक 98 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारासह 98 धावा फटकावल्या. त्याचे शतक मात्र दोन धावांनी हुकले. रेहमतने 80 चेंडूत 55 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार शाहिदी 47 चेंडूत 38 व मोहम्मद नाबी 28 चेंडूत 27 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. नजीबउल्लाह झद्रन 7 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 50 षटकांत सर्वबाद 268 (निसंका 38, असालेंका 91, धनजंय डी सिल्वा 51, फारुखी व अहमद प्रत्येकी दोन बळी, नूर अहमद, मोहम्मद नाबी, रेहमान, ओमरझाई प्रत्येकी एक बळी)
अफगाण 46.5 षटकांत 4 बाद 269 (इब्राहिम झद्रन 98, रेहमत शाह 55, हशमतउल्लाह शाहिदी 38, नाबी नाबाद 27, नजीबउल्लाह नाबाद 7, कसुन रजिथा दोन बळी, लहिरु कुमारा, पथिराणा प्रत्येकी एक बळी).
इब्राहिम झद्रनने मोडला शुबमन गिलचा विक्रम
अफगाणिस्तानच्या विजयाचा नायक ठरला तो 21 वर्षीय इब्राहिम झद्रान. इब्राहिमने 98 धावांची शानदार खेळी खेळली. विशेष म्हणजे त्याचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले. दोन धावा त्याने पुर्ण केल्या असत्या तर त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले असते. मात्र, इब्राहिमने श्रीलंकेविरुद्ध 98 धावा करून शुबमन गिलचा विक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ 9 डावात 500 धावांचा टप्पा इब्राहिमने पार केला आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वात जलद 500 धावा करणारा तो संयुक्त दुसरा खेळाडू बनला. अशा परिस्थितीत त्याने भारताचा युवा खेळाडू शुबमनचा विक्रमही मोडीत काढला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा करण्यासाठी गिलने 10 डाव घेतले. तर, सर्वात जलद 500 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जानेमन मालनच्या नावावर असून त्याने हा पराक्रम अवघ्या 7 डावात पूर्ण केला आहे.