वृत्तसंस्था/ शारजाह
येथे झालेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमिरातचा केवळ 4 धावांनी पराभव केला. सामनावीर इब्राहिम झद्रनने 48 धावा केल्या. यूएईला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना पॉवर हिटर असिफ खानने हे समीकरण 3 चेंडूत 5 धावा असे केले. पण डावखुरा वेगवान गोलंदाज फरीद अहमदने संयम राखत पुढच्या दोन चेंडूवर एकही धाव दिली नाही. शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याची गरज असल्याने त्याने उंच फटका मारला. पण लाँगऑफवर त्याचा झेल टिपला गेल्याने अमिरातला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. खानने 40 धावा केल्याने अमिरात 5 बाद 166 धावांपर्यंतच मजल मारता आल्याने एकमेव विजयापासून वंचित रहावे लागले.
अफगाणने या सामन्यात सहा आघाडीच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. रविवारी अफगाण व पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत होणार आहे. अफगाणने प्रथम खेळत 20 षटकांत 4 बाद 170 धावा जमविल्या. इब्राहिम झद्रन 48 धावांवर बाद झाल्याने त्याचे सलग तिसरे अर्धशतक हुकले. गुरबाझ व झद्रन यांनी सलामीला 72 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली. अफागाणने शेवटच्या पाच षटकांत 56 धावांची भर घातली. करिम जनतने 28, गुलबदिन नईबने नाबाद 20 धावा केल्या. पाक व अफगाण यांनी प्रत्येकी 3 विजय मिळविता उद्दिष्टाचे यशस्वी संरक्षण केले तर यूएईने धावांचा पाठलाग करताना चारही सामने गमविले.









