पहिल्या वनडेत 142 धावांनी पराभव : सामनावीर हॅरिस रौफचे पाच बळी
वृत्तसंस्था/ हंबनटोटा
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेतील हंबनटोटा येथे खेळला गेला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली. केवळ 202 धावांचा बचाव करत असताना हारिस रौफ, नसीम शहा व शाहीन आफ्रिदी या वेगवान गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा डाव केवळ 59 धावांवर गुंडाळत 142 धावांनी मोठा विजय साजरा केला.
त्रयस्थ ठिकाणी खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. मात्र, पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली सलामीवीर फखर झमान व बाबर आझम हे अनुक्रमे 2 व 0 धावांवर माघारी परतले. इमाम उल हक व मोहम्मद रिझवान यांनी छोटेखानी भागीदारी केली. रिझवान 21 धावा करून बाद झाल्यानंतर इमामने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. इफ्तिखार अहमद 30 व शादाब खान 39 यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेर नसीम शहा याने 18 धावा करत संघाला 200 ची मजल मारून दिली. अफगाणिस्तानसाठी मुजीबने तीन तर राशिद खान व मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 202 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव 19.2 षटकांत 59 धावांवर आटोपला. इब्राहिम, रहमत व शाहिदी या तिघांना खाते देखील खोलता आले नाही. केवळ चार धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव रुळावर आलाच नाही. सलामीवीर गुरबाझने सर्वाधिक 18 धावा तर अजमतउल्लाह उमरझाईने 16 धावा केल्या. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने अफगाणिस्तानला तब्बल 142 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानसाठी हॅरिस रौफने 18 धावांत सर्वाधिक पाच बळी टिपले. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.









