सुपर-4 फेरीतील भारताची शेवटची लढत, सरस प्रदर्शन साकारण्याचे भारतासमोर लक्ष्य
दुबई / वृत्तसंस्था
आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या भारतीय संघाची आज (गुरुवार दि. 8) अफगाणिस्तानविरुद्ध शेवटची सुपर-4 लढत होत आहे. भारतीय संघाने सुपर-4 फेरीत पूर्ण निराशा केली असून पाकिस्तान व श्रीलंकेविरुद्ध लागोपाठ दोन पराभव पत्करले आहेत. फारसे पर्याय हाताशी नसल्याचा आणि त्यातच खराब संघनिवडीचा संघाला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर, आजच्या टीम कॉम्बिनेशनकडे चाहत्यांचे लक्ष्य असेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता होईल.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कठोर निर्णय घेण्याचे सातत्याने टाळले असून संघाकडे प्लॅन बी असत नाही, याचे अनेकदा प्रत्यंतर आले आहे. त्या तुलनेत अफगाण संघाकडे रशिद खान, मुजीब झॅद्रन, मोहम्मद नबी, हझरतुल्लाह झॅझॅई व अव्वल दर्जाचा रहमानुल्लाह गुरबाझ यांच्यासारखे दमदार खेळाडू उपलब्ध असून यंदा आशिया चषकात त्यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे.
अफगाणचा संघ पॉवर हिटर्सची उणीव नसल्याने 170 च्या आसपास टार्गेटचा सहज यशस्वी पाठलाग करु शकतात. त्याचप्रमाणे, उत्तम गोलंदाज उपलब्ध असल्याने प्रतिस्पर्धी संघाच्या घोडदौडीला लगाम देखील लावू शकतात. आता या संघाकडे सातत्याने एकत्रित खेळण्याचा फारसा अनुभव नाही. पण, टी-20 चा फॉरमॅट पाहता, कोणताही संघ मुसंडी मारण्यास फारसा वेळ लागत नाही.
आजच्या लढतीत रिषभ पंत किंवा दीपक हुडाच्या जागी दिनेश कार्तिकला संधी दिली जाणार का, हे पहावे लागेल. सातव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या दीपक हुडाला गोलंदाजी देण्यात आली नव्हती आणि कर्णधार रोहित शर्माने या निर्णयाचे समर्थन केले होते. ‘श्रीलंकन सलामीवीर पथूम निसांका व कुशल मेंडिस यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे हुडाला गोलंदाजीत आणता आले नाही’, असे रोहित त्यावेळी म्हणाला होता.
हार्दिक पंडय़ाला स्पेशालिस्ट पाचवा गोलंदाज म्हणून खेळवणे परवडत नाही, असे श्रीलंकेविरुद्ध सामन्यात स्पष्ट झाले असून त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. चहलने सामन्यात 3 बळी घेतले असले तरी टी-20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाने दीपक चहरसारख्या खेळाडूला आजमावणे महत्त्वाचे ठरु शकते.
श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माने फलंदाजीत उत्तम योगदान दिले असले तरी टॉप थ्री फलंदाज एकत्रित केव्हा क्लिक होणार, हा कळीचा मुद्दा असणार आहे. टॉप थ्री मध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा निर्णय का घेतला जात नाही, हा प्रश्नही यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
अफगाणिस्तान ः मोहम्मद नबी (कर्णधार), नजिबुल्लाह झॅद्रन (उपकर्णधार), अफसर झॅझॅई (यष्टीरक्षक), अझमतुल्लाह ओमरझई, फरीद अहमद मलिक, फझल हक फारुकी, हशमतुल्लाह शाहिदी, हझरतुल्लाह झॅझॅई, इब्राहिम झॅद्रन, करीम जनत, मुजीब उर रहमान, नवीन अल हक, नूर अहमद, रहमानुल्लाह गुरबाझ (यष्टीरक्षक), रशिद खान, समिउल्लाह शिनवारी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
मागील दोन्ही सामन्यात भुवनेश्वरचे डावातील 19 वे षटक महागडे!

भुवनेश्वर कुमारने अलीकडील कालावधीत सातत्यपूर्ण मारा केला असला तरी यंदा आशिया चषकातील दोन्ही सुपर-4 लढतीत त्याच्या 19 व्या षटकातील खराब माऱयामुळेच संघाला अपयशाचा सामना करावा लागला, हे स्पष्ट आहे. भुवनेश्वरने पाकिस्तानला शेवटच्या 2 षटकात 26 धावांची गरज असताना डावातील 19 व्या षटकात 19 धावा बहाल केल्या होत्या तर त्यानंतर श्रीलंकेला 2 षटकात 21 धावांची गरज असताना 14 धावांची लयलूट करु दिली होती. यामुळे, युवा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यासमोर दोन्ही सामन्यातील शेवटच्या षटकात 7 धावांचे संरक्षण करण्याची कठीण जबाबदारी होती आणि दोन्ही वेळा तो प्रयत्न पणाला लावूनही त्यात कमी पडला.
कर्णधार रोहितने मात्र येथे भुवनेश्वरवर टीका करु नये, असे आवाहन केले. ‘अगदी अनुभवी गोलंदाज देखील महागडे ठरु शकतात. भुवी मागील अनेक वर्षे खेळत आला आहे आणि त्याने आपल्याला डेथ ओव्हर्समध्ये अनेक सामने जिंकून दिले आहेत’, असे रोहित सामन्यानंतर म्हणाला होता.









