नजमूल हुसेन, मोमिनूल हक यांची शतके
वृत्तसंस्था/ मीरपूर
येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान बांगलादेश अफगाणवर मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या सामन्यात बांगलादेशच्या नजमूल हुसेन आणि मोमिनूल हक यांच्या शानदार शतकांच्या जोरावर बांगलादेशने आपला दुसरा डाव 4 बाद 425 धावावर घोषित करून अफगाणला निर्णायक विजयासाठी 662 धावांचे कठीण आव्हान दिले. खेळाच्या तिसऱ्या दिवसअखेर अफगाणने दुसऱ्या डावात 2 बाद 45 धावा जमवल्या असून त्यांना विजयासाठी आणखी 617 धावांची जरुरी असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 382 धावा झळकवल्या. त्यानंतर अफगाणचा पहिला डाव 146 धावात आटोपला. बांगलादेशने अफगाणवर पहिल्या डावात 236 धावांची आघाडी मिळवली. बांगलादेशने फॉलोऑन उपलब्ध असूनही तो दिला नाही आणि आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. बांगलादेशने 1 बाद 134 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला. झाकीर हसन आणि नजमुल हसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 173 धावांची भागीदारी केली. झाकीर हसनने 8 चौकारासह 71 धावा जमवल्या. तो बाद झाल्यानंतर नजमूल हुसेन शांतो आणि मोमिनूल हक यांनी आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. नजमूल हुसेन शांतोने 151 चेंडूत 15 चौकारासह 124 धावा झळकवल्या. या कसोटी सामन्यातील नजमूल हुसेनचे हे सलग दुसरे शतक आहे. पहिल्या डावात त्याने 146 धावा झोडपल्या होत्या. नजमूल हुसेन शांतो आणि मोमिनूल हक यांनी तिसऱ्या गड्यासाठी 83 धावांची भर घातली. मुशफिकर रहीमने 8 धावा बाद झाला. मोमिनूल हक आणि लिटॉन दास यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 143 धावांची भागीदारी केली. बांगलादेशने चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात आपला दुसरा डाव 4 बाद 425 धावावर घोषित केला. मोमिनूल हकने 145 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारासह नाबाद 121 तर कर्णधार दासने 81 चेंडूत 8 चौकारासह नाबाद 66 धावा जमवल्या. कसोटी सामन्यात सलग दोन डावात शतक झळकवणारा नजमूल हुसेन शांतो हा बांगलादेशचा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी असा पराक्रम बांगलादेशच्या मोमिनूल हकने केला होता. मोमिनूल हकचे कसोटीतील हे 12 वे शतक आहे. अफगाणतर्फे झहीर खानने 2 तर हमजाने एक गडी बाद केला.

अफगाणने दुसऱ्या डावात 11 षटकात 2 बाद 45 धावा जमवल्या. त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. बांगलादेशच्या एस. इस्लामने अफगाणचा सलामीचा फलंदाज इब्राहिम झेद्रानला पहिल्याच चेंडुवर पायचित केले. त्यानंतर तस्कीन अहमदने अब्दुल मलिकला 5 धावावर झेलबाद केले. कर्णधार हसमतुल्ला शाहिदी 13 धावावर असताना त्याला दुखापत झाली. या दूखापतीमुळे तो निवृत्त झाला. दिवसअखेर अफगाणने दुसऱ्या डावात 2 बाद 45 धावा जमवल्या. रेहमतशहा 10 तर नासिर जमाल 5 धावावर खेळत आहेत. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम आणि तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून अफगाणचा संघ हा पराभव लांबवण्यासाठी प्रयत्न करेल. अफगाण संघाने 2019 साली चितगाँग येथे झालेला एकमेव कसोटी सामना यापूर्वी जिंकताना बांगलादेशचा 224 धावांनी पराभव केला होता.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प. डाव 86 षटकात सर्वबाद 382, अफगाण प. डाव 39 षटकात सर्व बाद 146, बांगलादेश दु. डाव 80 षटकात 4 बाद 425 डाव घोषित (नजमुल हुसेन शांतो 124, झाकीर हसन 71, मेहमुदुल हसन 17, मोमिनूल हक नाबाद 121, मुशफिकुर रहिम 8, लिटन दास नाबाद 66, झहीर खान 2-112, अमीर हमजा 1-90), अफगाण दु. डाव 11 षटकात 2 बाद 45 (इब्राहिम झद्रन 0, अब्दुल मलिक 5, रेहमतशहा खेळत आहे 10, हशमतुल्ला शाहिदी दुखापतीने निवृत्त 13, नासीर जमाल खेळत आहे 5, एस. इस्लाम 1-6, तस्कीन अहमद 1-28).









