नद्यांवर धरण बांधण्याची तयारी : तालिबान कमांडरने पाण्याला संबोधिले स्वत:चे रक्त
वृत्तसंस्था/ काबूल
भारतानंतर आता अफगाणिस्तानातील तालिबान राजवट देखील पाकिस्तानला दणका देणार आहे. अफगाणिस्तान स्वत:च्या नद्यांवर धरण बांधण्याची तयारी करत आहे. या धरणांच्या माध्यमातुन पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखला जाणार आहे. अफगाणिस्तानने हे पाऊल भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर उचलले आहे. तालिबानचा वरिष्ठ सैन्याधिकारी जनरल मुबीनने पूर्व अफगाणिस्तानच्या कुनार क्षेत्राचा दौरा करत तेथील संभाव्य धरण स्थळाची पाहणी केली आहे. पाकिस्तानच्या दिशेने वाहून जाणारे अफगाणिस्तानचे पाणी रोखण्यासाठी अनेक धरणे बांधण्यात येणार असल्याचा दावा मुबीनने केलाआहे.
हे पाणी आमचे रक्त असून आम्ही आमच्या रक्ताला नसांच्या बाहेर जाऊ देणार नाही. आम्हाला आमचे पाणी रोखावे लागेल, हे पाणी आमच्या वीजेची गरज पूर्ण करण्यास मदत करू शकते आणि आम्ही आमच्या कृषीक्षेत्राला आणखी मजबूत करू शकतो असे मुबीनने म्हटले आहे. कुनार नदी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात वाहत जाते. ही काबूल नदीची उपनदी असून याला सखल कृषि क्षेत्रांसाठी एक प्रमुख जलस्रोत मानले जाते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात कुठलाही जलवाटप करार नसल्याने तालिबानला हा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे.









