तिसऱ्या सामन्यात 59 धावांनी विजय, इमाम उल हक मालिकावीर, मोहम्मद रिझवान सामनावीर
वृत्तसंस्था/ कोलंबो
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात पाकने अफगाणचा 59 धावांची पराभव करून ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. पाकच्या इमाम उल हकला मालिकावीर तर मोहम्मद रिझवानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना पाकने 50 षटकात 8 बाद 268 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 48.4 षटकात 209 धावात आटोपला. अफगाणच्या मुजीब उर रेहमानचे अर्धशतक मात्र वाया गेले.
पाकने ही मालिका यापूर्वीच जिंकली होती. त्यांनी या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून अफगाणवर आघाडी मिळविली होती. पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके झळकविली.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकच्या डावामध्ये रिझवानने 79 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 67, बाबर आझमने 86 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 60, आगा सलमानने 31 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 38, मोहम्मद नवाझने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 30, फक्र झमानने 33 चेंडूत 5 चौकारांसह 27, इमाम उल हकने 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. शकील 9 धावावर तर शदाबखान 3 धावावर बाद झाले. पाकच्या डावात 4 षटकात आणि 24 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे नईब आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी 2 तर फरूकी, मुजीब उर रेहमान, रशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणचा डाव 48.4 षटकात 209 धावावर आटोपला. पाकच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर अफगाणचे सात फलंदाज केवळ 97 धावात तंबूत परतले होते. त्यानंतर शाहीदुल्ला आणि मुजीब उर रेहमान यांनी 8 व्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. अफगाणच्या डावात रियाज हसनने 66 चेंडूत 5 चौकारांसह 34, कर्णधार शाहिदीने 1 चौकारांसह 13, शाहिदुल्लाने 65 चेंडूत 2 चौकारांसह 65, रशीद खानने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 16, मुजीब उर रेहमानने 37 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 64 धावा झळकवल्या. फरीद अहमदने 1 चौकारांसह 17 धावा जमवताना मुजीबसमवेत 9 व्या गड्यासाठी 45 धावांची भर घातली. अफगाणच्या डावात 6 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. अफगाणने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 30 धावा जमवताना 2 गडी गमवले. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 30 षटकात 126 धावा जमवताना 6 गडी गमवले. तिसऱ्या आणि शेवटच्या पॉवरप्लेमध्ये शेवटच्या 10 षटकात अफगाणने 53 धावा जमवताना 2 गडी गमवले. पाकतर्फे शदाब खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 42 धावात 3 तर शाहीन आफ्रिदी, अश्रफ आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी 2 व आगा सलमानने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – पाक-50 षटकात 8 बाद 268 (मोहम्मद रिझवान 67, बाबर आझम 60, आगा सलमान नाबाद 38, मोहम्मद नवाज 30, फक्र जमान 27, इमाम उल हक 13, शकील 9, फरीद अहमद 2-70, नईब 2-36, फरूकी, मुजिब उर रेहमान, रशिद खान प्रत्येकी 1 बळी).
अफगाण 48.4 षटकात सर्वबाद 209 (मुजीब उर रेहमान 64, रियाज 34, शाहिदुल्ला 37, गुरबाज 5, शाहिदी 13, नबी 3, रशीद खान 16, फरीद अहमद 17, शदाब खान 3-42, शाहीन आफ्रिदी, अश्रफ, मोहम्मद नवाज प्रत्येकी दोन बळी, आगा सलमान 1-3).









