वृत्तसंस्था/ लाहोर
2023 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर – 4 फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी मंगळवारी येथे अफगाण आणि लंका यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. अफगाण संघाला या सामन्यात लंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. ब गटातून बांगलादेश संघाला पहिल्या सामन्यात लंकेकडून हार पत्करावी लागली होती. तर त्यानंतर बांगलादेशने अफगाणचा पराभव केला होता. आता अफगाण संघाला मंगळवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. या स्पर्धेत आता ब गटातून लंकेने आपली धावसरासरी +0.951 अशी राखली आहे. अफगाण विरुद्धच्या सामन्यात लंकेने 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे लंकेने बांगलादेशपेक्षा आपली धावसरासरी अधिक चांगली राखत सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर लंका – अफगाण यांच्यातील हा दुसरा सामना असून या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांची बरसात होईल असा अंदाज आहे.

अफगाण संघाची प्रामुख्याने फिस्त फिरकी गोलंदाज रशिद खान आणि मुजीब झेद्रान यांच्यावर राहिल. मात्र गेल्या रविवारच्या सामन्यात रशिदला एकही गडी बाद करता आला नव्हता. अफगाणला मंगळवारच्या सामन्यात आपले क्षेत्ररक्षण सुधारावे लागले. गुरुबाज आणि इब्राहिम झेद्रान हे अफगाण संघातील प्रमुख फलंदाज आहेत. लंकन संघातील तीन वेगवाग गोलंदाज जखमी असल्याने आता पथिरनावर अधिक जबाबदारी राहिल. पथिरनाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अचूक गोलंदाजी करत 4 गडी बाद केले होते. अफगाणच्या फलंदाजांना सावध फलंदाजी करावी लागले. महेश तिक्ष्णा हा लंकन संघातील महत्वाचा फिरकी गोलंदाज आहे. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असून नाणेफेकीनंतर दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू निश्चित करतील.
अफगाण संघ : शाहीदी (कर्णधार), इब्राहिम झेद्रान, इक्रम अलीखील, एन. झेद्रान, गुरुबाज, रियाज हसन, नईब, करिम जेनत, मोहम्मद नबी, रेहमत शहा, रशिद खान, एस. अशरफ, अब्दुल रेहमान, फरुखी, मोहम्मद सलीम, मुजीब ऊर रेहमान, नूर अहमद.
लंका संघ : डी. शनाका (कर्णधार), निशांका, डी. करुणारत्ने, कुशल परेरा, कुशल मेंडीस, सी. असालेंका, धनंजय डिसिल्वा, समरविक्रमा, महेश तिक्ष्णा, वेलालगी, मतीशा पथिरना, के. रजीता, डी. हेमंता, बिनुरा फर्नांडो आणि पी. मधुसुधन.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वाजता.









