दुसऱ्या वनडेत सादिकुलचे शतक, गझनफरचे 3 बळी
वृत्तसंस्था/हरारे
सादिकुल अटलचे शतक व अब्दुल मलिकने नोंदवलेले अर्धशतक तसेच गझनफर व नावीद झद्रन यांनी केलेला भेदक मारा यांच्या बळावर अफगाणिस्तानने येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा 232 धावांनी दणदणीत पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याआधी पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. शतक व 3 झेल टिपणाऱ्या सादिकुल अटलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. झिम्बाब्वेकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर अफगाणला सादिकुल अटल व अब्दुल मलिक यांनी दमदार सुरुवात करून देताना तब्बल 191 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. अफगाणने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 286 धावा जमविल्या. त्यानंतर गझनफर व नावीद झद्रन यांच्या भेदक गोलंदाजीपुढे झिम्बाब्वेचा डाव 17.5 षटकांत केवळ 54 धावांत गुंडाळून अफगाणने दणदणीत विजय मिळविला.
अफगाणच्या डावात सादिकुलने 128 चेंडूत 8 चौकार, 4 षटकारांसह 104 तर अब्दुल मलिकने 101 चेंडूत 11 चौकार, एक षटकारासह 84 धावा जमविल्या. याशिवाय कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 30 चेंडूत नाबाद 29, मोहम्मद नबीने 18 धावा जमविल्या. अफगाणला अवांतराच्या रूपात तब्बल 40 धावा मिळाल्या. त्यात 24 वाईड धावांचा समावेश आहे. झिम्बाब्वेतर्फे न्यूमन न्याम्हुरीने 53 धावांत 3, ट्रेव्हर ग्वंडूने 70 धावांत 2 व रिचर्ड एन्गराव्हाने 49 धावांत 1 बळी मिळविला. झिम्बाब्वेच्या डावात सीन विल्यम्स (16) व सिकंदर रझा (नाबाद 19) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यांचा डाव 18 व्या षटकांत 54 धावांत संपुष्टात आला. गझनफरने 9 धावांत 3 व नावीद झद्रनने 13 धावांत 3 बळी मिळविले तर फझलहक फारुकीने 15 धावांत 2 व अझमतुल्लाह ओमरझाइने एक बळी टिपला. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : अफगाण 50 षटकांत 6 बाद 286 : सादिकुल अटल 104, अब्दुल मलिक 84, हशमतुल्लाह शाहिदी नाबाद 29, नवी 18, अवांतर 40, न्यूमन न्याम्हुरी 3-53, ट्रेव्हर ग्वंडू 2-70, रिचर्ड एन्गराव्हा 1-49. झिम्बाब्वे 17.5 षटकांत सर्वबाद 54 : सीन विल्यम्स 16, सिकंदर रझा नाबाद 19, गझनफर 3-9, नावीद झद्रन 3-13, फझलहक फारुकी 2-15, अझमतुल्लाह ओमरझाइ 1-17.









