पराभवासह इंग्लंडचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात : अफगाणचे आव्हान कायम
वृत्तसंस्था लाहोर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करताना इंग्लंडला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव करत धक्कादायक विजयाची नोंद केली. यासह इंग्लंडचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर अफगाणिस्तानचा संघ अजूनही उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत कायम आहे. अफगाण संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावत 325 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 317 धावांत ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला उमरझाईने 5 विकेट्स तर इब्राहिम झद्रनने 177 धावांची खेळी केली, जे संघाच्या विजयाचे हिरो ठरले.
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 326 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिल सॉल्ट व जेमी स्मिथ स्वस्तात बाद झाले. यानंतर बेन डकेटने 38 धावांची खेळी साकारली पण तोही फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर अनुभवी जो रुटने हॅरी ब्रुकसह संघाचा डाव पुढे नेला. ब्रुकने 25 धावांची खेळी साकारली. एकीकडे विकेट्स पडत असताना जो रुटने मात्र किल्ला लढवताना वनडेतील 17 वे शतक साजरे केले. त्याने 111 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह 120 धावांची खेळी केली. फटकेबाजीच्या प्रयत्नात तो बाद झाल्यानंतर इंग्लंडचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. जोस बटलर (38) व जेमी ओव्हर्टन (32) या स्टार खेळाडूंनाही मोठी खेळी साकारता आली नाही. याशिवाय, इतर इंग्लिश फलंदाजांनीही हाराकिरी केल्यामुळे इंग्लंडचा डाव 317 धावांत आटोपला. अफगाणकडून उमरझाईने सर्वाधिक 5 बळी मिळवले.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय अजिबात चांगला ठरला नाही कारण अफगाण संघाने 37 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर गुरबाज (6), सैदीकुल्ला अटल (4) व रेहमत शाह (4) हे स्टार फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर, इब्राहिम झद्रनने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीसह 104 धावांची भागीदारी केली आणि आपल्या संघाला सामन्यात परत आणले.
इब्राहिम झद्रनची वादळी खेळी
अफगाणिस्तानचा युवा सलामीवीर इब्राहिम झद्रनने इंग्लंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावण्याची किमया केली. झद्रन हा या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा पहिला अफगाणिस्तानचा फलंदाज ठरला आहे. लाहोरमध्ये झालेल्या या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने लवकर 3 विकेट गमावल्यानंतर, 23 वर्षीय युवा सलामीवीर झद्रनने डावाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर वेग वाढवला आणि उत्कृष्ट शतक झळकावले. झद्रनने 146 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह 177 धावांची वादळी खेळी केली. त्याचे हे वनडेतील सहावे शतक ठरले. दरम्यान, हशमतउल्लाह शाहिदीने त्याला चांगली साथ देताना 40 धावांचे योगदान दिले. शाहिदी बाद झाल्यानंतर उमरझाई (40) व मोहम्मद नबी (41) यांनी झद्रनला साथ देताना अफगाणिस्तानचे त्रिशतक फलकावर लावले. झद्रनच्या या वादळी खेळीमुळे अफगाण संघाने 50 षटकांत 7 बाद 325 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान 50 षटकांत 7 बाद 325 (इब्राहिम झद्रन 177, हशमतउल्लाह शाहिदी 40, उमरझाई 41, मोहम्मद नबी 40, जोफ्रा आर्चर 3 बळी, लिव्हिंगस्टोन 2 बळी, ओव्हर्टन व आदिल रशीद प्रत्येकी एक बळी).
इंग्लंड 49.5 षटकांत सर्वबाद 317 (बेन डकेट 38, जो रुट 120, जोस बटलर 38, ओव्हर्टन 32, उमरझाई 5 बळी, मोहम्मद नबी 2 बळी).
12 चौकार, 6 षटकार, इब्राहिम झद्रनची सर्वोच्च खेळी
इंग्लंडविरुद्ध लढतीत इब्राहिम झद्रनने मोठी कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. इब्राहिमनने इंग्लिश गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना 177 धावांची विक्रमी खेळी साकारली. विशेष म्हणजे, 177 धावांच्या खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतच इंग्लंडच्या बेन डकेटने 165 धावा केल्या होत्या. आता त्याला मागे टाकत इब्राहिमने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्या
177 – इब्राहिम झादरान वि. इंग्लंड, लाहोर (2025)
165 – बेन डकेट वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर (2025)
145 – नॅथन अॅस्टल वि. यूएसए, द ओव्हल (2004).









