रशिद खानचे वनडे क्रिकेटमधील बळींचे द्विशतक
वृत्तसंस्था/अबू धाबी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अफगाणने बांगलादेशचा पाच गड्यांनी दणदणीत पराभव करुन विजयी सलामी दिली. या सामन्यात अफगाण संघातील रशिद खानने आपल्या वैयक्तिक वनडे क्रिकेटमध्ये बळींचे द्विशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा रशिद खान हा अफगाणचा पहिला फिरकी गोलंदाज आहे. अफगाणच्या अझमतुल्लाह ओमरझाईला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र अफगाणच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 48.5 षटकात 221 धावांत आटोपला. बांगलादेशकडून अफगाणला विजयासाठी 222 धावांचे आव्हान मिळाले होते. पण अफगाणने हे उद्दिष्ट 17 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.
बांगलादेशच्या डावामध्ये अफगाणच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांची सुरूवातीला स्थिती 3 बाद 53 अशी केविलवाणी होती. त्यानंतर रिदॉय आणि मेहदी हसन मिराज यांनी चौथ्या गड्यासाठी 101 धावांची भागिदारी केली. रिदॉयने 85 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 56 धावा झळकविल्या. मेहदी हसन मिराजने 1 षटकार आणि 1 चौकारासह 60 धावा जमविल्या. पण एकेरी धाव घेण्याच्या नादात रिदॉय धावचीत झाला. त्यानंतर अफगाणचा फिरकी गोलंदाज रशिद खानने बांगलादेशचे तीन गडी झटपट बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 48.5 सर्वबाद 221 (रिदॉय 56, मेहदी हसन मिराज 60, रशिद खान व ओमरझाई प्रत्येकी 3 बळी, गझनफर 2-55, खरोटे 1-32), अफगाण 47.5 षटकात 5 बाद 222 (इब्राहीम झद्रन 23, गुरूबाज 50, रेहमत शहा 50, अझमतुल्लाह ओमरझाई 40, शाहीदी 33, नबी नाबाद 11).









