वृत्तसंस्था/ चेन्नई
गतविजेत्या इंग्लंडवर विजयामुळे अफगाणिस्तानला नवीन आत्मविश्वास प्राप्त झाला असून आज बुधवारी येथे होणाऱ्या विश्वचषक सामन्यात त्यांची गांठ न्यूझीलंडशी पडणार आहे. न्यूझीलंड हशमतुल्ला शाहिदीच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. पण किवीज या स्पर्धेतील आपली अपराजित दौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर इंग्लंडला 69 धावांनी धक्का देणारा अफगाणिस्तान आणखी एक मोठा धक्का देऊन स्पर्धेतील आपल्या मोहिमेला बळ देण्यास उत्सुक असेल.

न्यूझीलंडने या स्पर्धेतील आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले असून ते सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. निव्वळ धावसरासरीमुळे ते भारताच्या मागे पडले आहेत. दुसरीकडे, अफगाणिस्तानने रविवारी नवी दिल्लीत जोस बटलरच्या इंग्लंडला खिळखिळीत करून सोडण्यापूर्वी बांगलादेश आणि भारताविऊद्ध मोहिमेची सुऊवात पराभवांनी केली होती. न्यूझीलंडचे नेतृत्व या सामन्यात पुन्हा यष्टिरक्षक-फलंदाज टॉम लॅथम करणार आहे. कारण त्यांचा कर्णधार केन विल्यमसनला बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने तो काही सामने खेळू शकणार नाही.
यंदा आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरलेला नसल्यामुळे विल्यमसन इंग्लंड आणि नेदरलँड्सविऊद्धचे सुऊवातीचे दोन सामने खेळू शकला नव्हता. पाच महिन्यांहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर मागील सामन्यात मैदानात उतरल्यावेळी तो शतकाची नोंद करेल असे वाटत होते. पण मैदानातून फेकलेला चेंडू अंगठ्याला लागल्याने या कर्णधाराचा डाव 78 धावांवर आटोपला. विल्यमसन बाहेर पडणे हा मोठा धक्का असला, तरी किवीज त्यांच्या आतापर्यंतच्या यशावर विश्वास ठेवून त्यांचा सलग चौथा विजय नोंदविण्यासाठी प्रयत्नशील असतील.
दुखापतीतून सावरलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीला अफगाणिस्तानविऊद्ध संधी मिळते का हे पाहणे मनोरंजक ठरेल. विल यंग, डेव्हन कॉनवे व डॅरिल मिशेल यांचा समावेश असलेल्या वरच्या फळीवर किवीज मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील. सर्व विभागांमध्ये प्रभावी कामगिरी केलेला अष्टपैलू रचिन रवींद्रवरही सर्वांच्या नजरा असतील. किवी फलंदाजांनी अफगाणिस्तानचे फिरकीपटू रशिद खान आणि मोहम्मद नबी यांचे व्हिडीओ फुटेज अनेक वेळा पाहून घेतलेले असेल, कारण या दोघांनी इंग्लंडचे पाच फलंदाज टिपले.
चेपॉकवर हा सामना होणार असून येथील खेळपट्टी नेहमी फिरकीपटूंना मदत करते. त्यामुळे रशिद, मुजीब उर रेहमान आणि नबी या फिरकी त्रिकुटाचे न्यूझीलंडसमोर मुख्य आव्हान राहणार आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा फॉर्मात आहे. कर्णधार शाहिदी, अजमतुल्ला ओमरझाई आणि इक्रम अलीखिल हे देखील उपयुक्त ठरू शकतात. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री या वेगवान जोडीची प्रामुख्याने धास्ती राहणार असली, तरी त्यांना मुख्य आव्हान अनपेक्षितपणे रवींद्र आणि मिचेल सँटनर या फिरकी जोडीकडून मिळू शकते.
संघ : न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार-मात्र दुखापतीमुळे खेळू शकणार नाही), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी आणि विल यंग.
अफगाणिस्तान : हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फाऊखी, अब्दुल रेहमान आणि नवीन उल हक.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









