प्रथमच अफगाणचा इंग्लंडवर विजय : सामनावीर मुजीब रेहमानचे तीन बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणी वादळ पहायला मिळाले. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडवर 69 धावांनी विजय मिळवताना यंदाच्या वर्ल्डकपमधील धक्कादायक निकालाची नोंद केली. प्रारंभी अफगाण संघाने फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर 49.5 षटकात सर्वबाद 284 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांवर आटोपला. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.
2015 च्या विश्वचषकात पदार्पण केल्यानंतर अफगाणिस्तानचा हा इंग्लंडविरुद्धचा पहिलाच विजय आहे. याचबरोबर इंग्लंडला 12 वर्षात दुसऱ्यांदा भारतीय भूमीवर दुबळ्या संघाकडून पराभवाचा दणका बसला आहे. 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडने बेंगळूरमध्ये इंग्लंडचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. सामनावीर मुजीब रेहमान, रशीद खान व मोहम्मद नाबी या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. इंग्लंडने आतापर्यंत 3 सामने खेळले असून त्यापैकी दोनमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. अफगाण संघाचा हा तीन सामन्यातील पहिलाच विजय आहे.
अफगाणी फिरकीपटूंचा दणका
विजयासाठीच्या 285 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. दुसऱ्याच षटकात सलामीवीर जॉनी बेअरस्टो 2 धावांवर बाद झाला. यानंतर अनुभवी जो रुट देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. रुटला मुजीबने बाद केले. यानंतर डेविड मालन (32) व कर्णधार जोस बटलर (9) धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची 4 बाद 91 अशी स्थिती झाली होती. हॅरी ब्रुकने 61 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 66 धावा फटकावल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. लिव्हिंगस्टोन (10), सॅम करन (10), ख्रिस वोक्स (9) यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. तळाचे फलंदाज आदिल रशीद 20 धावा, मार्क वूड 18 व टोप्ली 15 धावा केल्याने इंग्लंडला दोनशेचा टप्पा गाठता आला. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीब रेहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांत संपुष्टात आणला.
गुरबाज-इक्रमची शानदार अर्धशतके
प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अफगाण सलामीवीर रेहमानउल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झद्रन यांनी दमदार फलंदाजी करताना पहिल्याच विकेटसाठी 16.4 षटका 114 धावांची दमदार सलामी दिली. दरम्यान, 28 धावांवर इब्राहिम झद्रनला आदिल रशीदने बाद करत अफगाणला पहिला धक्का दिला. रेहमानुल्लाहने आक्रमक खेळी साकारताना 57 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारासह धावा फटकावल्या. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक आहे. डावातील 19 व्या षटकांत रेहमत शाहला (3) रशीदने तंबूचा रस्ता दाखवला. पाठोपाठ रेहमानुल्लाहही 80 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. यानंतर कर्णधार हशमतउल्लाह शाहिदी (14), उमरझाई (19) व मोहम्मद नाबी (9) हे स्वस्तात बाद झाल्याने अफगाण संघाची 6 बाद 190 अशी स्थिती झाली होती. पण, मधल्या फळीतील फलंदाज इक्रम अलीखीलने 66 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह 58 धावा करत संघाला पावणे तीनशेचा टप्पा गाठून दिला. रशीद खान (3 चौकारासह 22) आणि मुजीब रेहमान (16 चेंडूत 28) यांनीही छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने अफगाणचा डाव 49.5 षटकांत 284 धावांवर आटोपला. दरम्यान, अफगाणिस्तानची वर्ल्डकपमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी 289 धावांचा डोंगर वेस्ट इंडिजविरुद्ध उभा केला होता
इंग्लंडकडून आदिल रशीदने 3, मार्क वूडने 2 आणि टोपली, लिव्हिंगस्टोन, रूटने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 49.5 षटकांत सर्वबाद 284 (रेहमानउल्लाह गुरबाज 80, इक्रम अलीखील 58, रशीद खान 22, मुजीब रेहमान 28, आदिल रशीद 42 धावांत 3 बळी, मार्क वूड 50 धावांत 2 बळी).
इंग्लंड 40.3 षटकांत सर्वबाद 215 (डेविड मालन 32, हॅरी ब्रुक 66, आदिल रशीद 20, मार्क वूड 18, टोप्ली नाबाद 15, मुजीब 50 धावांत 3 बळी, रशीद खान 37 धावांत 3 बळी, मोहम्मद नाबी 16 धावांत 2 बळी).
इंग्लंडचे जोनाथन ट्रॉट अफगाण संघाचे प्रशिक्षक
इंग्लंडविरुद्ध विजयाचे सारे श्रेय अर्थातच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांना जाते. ते इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते सध्या अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक आहेत. इंग्लंड संघाचे कच्चे दुवे ट्रॉट यांना माहित असल्यामुळे अफगाण संघाला याचा चांगलाच फायदा झाला. अफगाण संघाच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करताना इंग्लंडविरुद्ध धक्कादायक निकालाची नोंद केली.









