मुलांसह 28 जण जखमी : चालक अटकेत, दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन तपासणार
वृत्तसंस्था/म्युनिक
जर्मनीतील शहर म्युनिकमध्ये एका व्यक्तीने आपली गाडी निदर्शकांवर चालवल्याने खळबळ उडाली. या अपघातात 28 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 च्या सुमारास म्युनिक शहराच्या मध्यवर्ती भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अफगाणिस्तानी चालकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून मिनी कारही जप्त केली आहे. या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन तपासले जात आहे. शुक्रवारपासून म्युनिकमध्ये सुरक्षा शिखर परिषद सुरू होत असतानाच ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, या अपघातात किमान 28 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. निदर्शकांवर जाणूनबुजून कार चढवण्यात आली की नाही याची शहानिशा केली जात आहे. म्युनिकचे महापौर डायटर रीटर यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करत जखमींमध्ये मुलांचा समावेश असल्याचे सांगितले. घटनेच्यावेळी सर्व्हिस वर्कर्स युनियनचे लोक निषेध करत होते. याचदरम्यान येथे एका व्यक्तीने गर्दीवर आपली गाडी चालवल्यामुळे किमान 28 लोक जखमी झाले. ही घटना म्युनिकच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून पोलीस चालकाची चौकशी करत आहेत.
सुरक्षा शिखर परिषदेच्या आयोजनापूर्वी घटना
‘म्युनिक सुरक्षा शिखर परिषद’ शुक्रवारपासून म्युनिकमध्ये सुरू होत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे शिखर परिषदेला उपस्थित राहतील. हा अपघात शिखर परिषद स्थळापासून फक्त 1.5 किमी अंतरावर घडला. म्युनिक सुरक्षा शिखर परिषद ही आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोरणावरील वार्षिक बैठक आहे. ही परिषद 1963 पासून म्युनिकमध्ये आयोजित केली जात आहे. पूर्वी त्याचे नाव म्युनिक कॉन्फरन्स ऑन सिक्युरिटी पॉलिसी असे होते. जगातील देशांमध्ये संवादाद्वारे शांतता प्रस्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे.









