रविवारी सकाळी वारलेल्या महिलेवर सोमवारी संध्याकळी अंत्यसंस्कार
वार्ताहर /हरमल
भंडारवाडा-बागाईतवाडा, पालये भागातील स्मशानभूमीच्या जमिनीच्या तिढ्याची शुक्रवारी सुनावणी झाली आणि मंगळवारी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल होण्याची शक्यता अनेकांना होती. मात्र तत्पूर्वी रविवारी मृत्यू झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या मृतदेहाची परवड झाली. अंत्यसंस्कारांसाठी काल सोमवारी संध्याकाळी 5 पर्यत वाड्यावरील लोकांना तिष्ठत राहावे लागले. या प्रकारामुळे जनमानसांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार 6 रोजी संध्याकाळी 6 वाजता भंडारवाडा-पालये येथील ज्येष्ठ महिला श्रीमती पार्वती शंकर गडेकर (वय 70) यांचे निधन झाले. सोमवार 7 रोजी अंत्यसंस्काराची तयारी वाड्यावरील लोकांकडून होत होती. मात्र त्या स्मशानभूमीच्या सभोवती जमिनमालक मंजुषा रघु गवंडी (भंडारवाडा-पालये) यांनी तारेचे कुंपण घातल्याने तेथे जाऊन अंत्यसंस्कार करण्यात अडचण आली आणि मृतदेहाची परवड सुरु झाली.
प्रकरण 2021 पासून न्यायप्रविष्ठ
साधारणपणे 2021 पासून स्मशानभूमीचा हा तिढा मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीला होता. त्या वाड्यावरील नागरिकांना भाटकार काशिनाथ हिरू नायक यांनी शंभर मीटर जागा स्मशानभूमीसाठी लिखित स्वरूपात दान दिली आहे. प्रति चौ.मी. 15 रुपये दर निश्चित केला होता. 100 मीटरप्रमाणे एकूण 1500 रुपये किंमत होती. परंतु ही जागा त्यावेळी जमिनमालकाने मोफत दिली. पारंपरिक स्मशानभूमी वापरण्यास आपली कुठलीच हरकत नाही. अन्य कुणीही आडकाठी आणू नये, असे म्हटले होते. त्याचा पुरावा स्थानिकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे, अशी माहिती माजी सरपंच उदय भिवा गवंडी यांनी दिली.
रविवारी प्रश्न आला होता ग्रामसभेत
रविवारी 6 ऑगस्ट रोजी सकाळी झालेली पालये ग्रामसभा या पारंपरिक स्मशानभूमी प्रश्नावरून गाजली होती, मात्र हतबल पंचायतमंडळ ठोस भूमिका घेऊ न शकल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. पंचायत मंडळाने या पारंपरिक स्मशानभूमीची पाहणी करून योग्य निर्णय देणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने संध्याकाळी निधन झालेल्या या ज्येष्ठ महिलेवर अंत्यसंस्कार कुठे करावेत, असा प्रश्न स्थानिकांसमोर आला. योग्य निर्णय झाला असता तर अशी मृतदेहाची परवड झाली नसती.
मंजूषा गवंडी यांच्याकडून अतिक्रमण
भंडारवाडा-बागाईत सर्व्हे नं. 54/1 मध्ये ही पारंपरिक स्मशानभूमी असून भंडारवाडा व नजिकच्या वाड्यावरील लोकांसाठी ही आहे, मात्र मंजूषा रघु गवंडी यांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. 2003 मध्ये पंचायतीने या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी फुटपाथ बांधली होती. तसेच दगडी कुंपण घातले होते. तेथे आता नूतनीकरणाचे काम पंचायत मंडळाने करावे व वाड्यावरील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी ग्रामसभेत झाली होती. वाड्यावरील ग्रामस्थांच्यावतीने प्रभाकर गडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्न न्यायालयीन असल्याने न्यायालयीन सल्ला घेऊनच हे प्रकरण हाताळण्यात येईल, असे आश्वासन सरपंच, सचिवाने ग्रामस्थांना दिले होते. याबाबत योग्य निर्णय न झाल्याने या ज्येष्ठ महिलेच्या मृतदेहाची परवड झाली.
पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज
रविवारी श्रीमती पार्वती शंकर गडेकर यांचे निधन झाले. त्यावेळी अंत्यसंस्कार कुठे करावेत, अशा प्रश्न निर्माण झाला. या दु:खद परिस्थितीत स्थानिकांनी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. कायदा सुव्यवस्था प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. या अर्जावर सुनावणी होऊन पेडणे पोलीस, मामलेदार व पंचायत मंडळ यांना आदेशाची प्रत दिली व स्मशानभूमीत अनुचित प्रकार होऊ नये, असा आदेश देण्यात आला. अंत्यसंस्कार व अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधी या पारंपरिक स्मशानभूमीत करण्यास गडेकर कुटुंबियांना मोकळीक दिल्याचे अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.
पंचायत सचिवाकडून आदेशाचे वाचन
पंचायत सचिव सचिन धावस्कर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वाचून दाखवला व अडचणी निर्माण केल्यास ताब्यात घेण्याची तसेच स्मशानभूमीच्या वाटेवरील अडथळे दूर करून मृतदेहाचे दहन करावे, असे आदेशात असल्याचे धावस्कर यांनी सांगितले. तद्नंतर या स्मशानभूमीचे तारेचे कुंपण सरपंच रंजना परब, पंचायतसदस्य राधा परब, संदीप न्हानजी, शिवा तिळवे, पंचायतीचे कर्मचारी, पोलीस यांच्या उपस्थितीत काढण्यात आले व अंत्यसंस्काराचा मार्ग मोकळा करण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी उपजिल्हाधिकारी व अन्य कार्यालयाने सहकार्य देऊन बागाईत-भंडारवाड्यावरील लोकांना आश्वस्त केल्याबद्दल स्थानिकांनी धन्यवाद दिले. 30 जानेवारी 2023 मध्ये माजी सरपंच उदय भिवा गवंडी यांच्या भगिनी कल्याणी गवंडी यांचे निधन झाले होते. त्यावेळी अशीच परिस्थिती अंत्यसंस्कारावेळी स्थानिकांवर उद्भवली होती.
अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये : राधा परब
गावातील जातीय सलोखा व बंधुभाव टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशी स्थिती पुन्हा उद्भवू नये, असे पंचायतसदस्य राधा परब यांनी सांगितले.
देवाने सुबुद्धी द्यावी : न्हानजी
किमान अंत्यसंस्कार करण्यास कसलीच आडकाठी आणू नये. देवांनी त्यांना सुबुद्धी द्यावी, असे उद्गार पंचायतसदस्य संदीप न्हानजी म्हणाले.
संतांच्या भूमीतील हा प्रकार शोभादायक नाही : पालयेकर
पालये गाव ही संत सोहिरोबानाथ यांची जन्मभूमी संबोधली जाते आणि या गावात ज्येष्ठ नागरिकांच्या मृतदेहाची होणारी ही परवड निश्चितच शोभादायक नाही, अशी प्रतिक्रिया पालये गावातील एक ज्येष्ठ नागरिक मोहन पालयेकर यांनी दिली.









