मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांची माहिती
बेळगाव : राज्यातील कर्करोगग्रस्त गरीब रुग्णांवर किडवाई रुग्णालयात मोफत चिकित्सा व सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात उच्च दर्जाची वैद्यकीय चिकित्सा देण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण-कौशल्य विकासमंत्री डॉ. शरणप्रकाश आर. पाटील यांनी दिली. विधानपरिषदेमध्ये एम. नागराजु यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री शरणप्रकाश पाटील बोलत होते. दारिद्ररेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना आयुष्यमान भारत-आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. सर्वसामान्य रुग्णांवर सवलतीच्या दरात म्हणजे 30 टक्के सरकारकडून व 70 टक्के रुग्णांकडून शुल्क घेऊन वैद्यकीय चिकित्सा करण्यात येत आहे.
याशिवाय एससीपी व टीएसपी योजनेंतर्गत मोफत कर्करोग चिकित्सा देण्यात येत आहे. रोबोटिक शस्त्रचिकित्सा (बोर्नमॅरो) व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांवर कर्करोग तपासणीसाठी आवश्यक असलेले पीईटी-स्कॅन सुविधा किडवाई स्मारक रुग्णालयात मोफत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ज्योती संजीवनी योजनेंतर्गत कर्करोगावर चिकित्सा करण्यात येत आहे. राज्यातील जिल्हा स्तरावरील 31 रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी संबंधित वैद्यकीय उपकरणे खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. मुत्रपिंडाच्या आजारावर राज्यातील 193 वैद्यकीय केंद्रांमध्ये 763 डायलेसीस मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी दिली.









