शिक्षकवर्गाकडून समाजाला सर्वाधिक अपेक्षा : ‘मुकी बिचारी कुणी हाका’ हे सूत्र विद्यार्थी-शिक्षकांनाही लागू
बेळगाव : खरे तर त्याला पहाटेच काय सकाळी मुळीच उठायचे नसते. उठल्यापासून सूचनांचा भडिमार झेलत तयार होऊन गर्दीच्या रिक्षामध्ये त्याला जायचेच नसते. त्याच्या चिमुकल्या पायांना खरे तर बूट नको असतात. परंतु, पाश्चात्यांचे अनुकरण आणि लखलखाट, चकचकाटाच्या अट्टहासापोटी आम्ही ते त्याच्यावर लादलेले असतात. शाळेत पाऊल टाकताच तेच ते चाकोरीबद्ध वर्ग आणि तेच ते चाकोरीतील शिक्षण त्याला प्रयोगशील होण्यापासून खरे तर दूरच ठेवत असते. मुक्तपणे बागडत आनंदाने काही गोष्टी शिकण्याची त्याची/तिची तयारी आहे. मात्र, ‘शिक्षण’ या एका भल्यामोठ्या प्रश्नचिन्हाच्या आवर्तनामध्ये आम्ही त्याला ढकलत आहोत. पर्यायाने शिक्षक नावाच्या महत्त्वाच्या घटकाचीसुद्धा कोंडी करत आहोत. या समाजात सर्वाधिक अपेक्षा कोणाकडून केल्या जात असतील तर त्या शिक्षकांकडून. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला हवे. ते त्यांचे परमकर्तव्यच आहे. त्यांनी सरकारी कामे करायलाच हवीत. ते खेड्यात काम करत असतील तर तेथील निम्म्या सरकारी योजनांची जबाबदारी त्यांच्यावर असते. तेथील गायी-म्हशींची नोंद, लसीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनगणना, निवडणुका आल्या की मतदार यादी तयार करणे यासह अन्य तपशील त्यांनी सरकारदरबारी पुरविणे हा त्यांच्या शिक्षकीपेशाचाच एक भाग बनला आहे. या लादलेल्या कामांचा ताण कमी झाला तर शिक्षक थोडेसे मोकळे होतील आणि ज्ञानदानावर लक्ष केंद्रित करू शकतील. परंतु, दुर्दैवाने तशा आशादायी चित्राची अपेक्षा करणे म्हणजे दिवास्वप्नच होय. अर्थात अनेक गोष्टींसाठी शिक्षकही कारणीभूत आहेत. अनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी वेतन मिळते. परंतु, विद्यार्थी घडविणे या हेतूने झपाटलेले शिक्षक अभावानेच दिसतील. ज्यांना खरोखर विद्यार्थी घडवायचा आहे, त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्याच रोडावत आहे. शिक्षकबदलीच्या गोंधळात शिक्षकच पुरते गोंधळून गेले आहेत. सरकारी दबाव, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, अनियंत्रित विद्यार्था संख्या, समाजमाध्यमांमुळे आलेले नको ते शहाणपण अशा विचित्र कोंडीत शिक्षकाने विद्यार्थ्यांना घडविलेच पाहिजे, ही अपेक्षा कितपत रास्त आहे? दुसरीकडे शिक्षक संघटना आणि त्यांचे राजकारण हा आणखीन एक चिंतेचा विषय होऊन बसला आहे. त्यात पुन्हा मध्ये मध्ये भाषाभेदाचे राजकारण डोकावतच राहते.
वास्तविक शाळेच्या चार भिंतींमधील शिक्षणाचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही वैताग आलेला आहे. ‘मुकी बिचारी कुणी हाका’, हे सूत्र विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनासुद्धा लागू पडणारे आहे. आज विद्यार्थ्यांना प्रयोगशील शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्यादृष्टीने काही प्रयत्न केले गेले. पण आता ते यशस्वी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. सतत बदलणाऱ्या सरकारी धोरणांचा मोठा फटका शिक्षकांनाही बसतो आहे. त्यामुळे मुलांना बाहेरच्या जगात नेऊन प्रयोगशील शिक्षण देण्याची गरज भागवायची कोणी? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. अनेक शाळांमध्ये उत्तम शिक्षक आहेत, मात्र, त्यांना निर्णयाचे आणि विचाराचे स्वातंत्र्य शिक्षण खात्याने आणि व्यवस्थापनाने द्यायला हवे. एखादी छडी बसली म्हणून शाळेत येऊन दंगा, आकांडतांडव करणे, अगदी आंदोलनापर्यंत मजल जाणे असे प्रकार घडल्यावर शिक्षक एक पाऊल मागेच घेतो. त्यामुळे प्रयोगशील शिक्षण देण्याची त्याची ऊर्मी मारली जाते. दुर्दैवाने याचा परिणाम शिक्षणावर होतच आहे. दिलेला तास पूर्ण करणे आणि बाहेर पडणे, अशी शिक्षकांची मानसिकता असेल तर तो समाजाचा आणि पालक म्हणून आपल्या सर्वांचा दोष आहे. शिक्षकांवर आलेला ताण लक्षात घेता निवृत्त शिक्षकांना आणि नागरिकांना परिवर्तनाच्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून काही प्रयोग करणे सहजशक्य आहे. देशातील राजकारण, बदललेले वातावरण, जागतिक युद्ध, बातम्या आणि बिघडलेली पिढी याबद्दल सतत चर्वितचर्वण करणाऱ्या मंडळींनी आता कृतिशील होणे आवश्यक आहे. जे असे काम करत आहेत, त्यांच्याबद्दल निश्चितच आदर असला तरी संख्येच्या तुलनेत त्यांचे प्रमाण वाढलेले मात्र दिसत नाही.
नेमके काय करावयाचे आहे?
आज शाळेमध्ये जेवढे शिक्षण मिळते, त्यापेक्षा दुप्पट शिक्षण बाहेरच्या जगात मिळत आहे. नवतंत्रज्ञानाने व्यापक अवकाश खुले केले, हे खरे आहे. परंतु, तितकेच प्रश्न निर्माण केले. शिक्षण नक्की काय देणार आहे? इथपासून या शिक्षणामुळे नोकरी-उद्योग यांची संधी मिळणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. इतकेच नव्हे तर शाळेतील अभ्यासक्रमही पूर्ण होईलच, याची खात्री नाही. अशा वेळी निवृत्त शिक्षकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, प्राध्यापकांनी गट करून शाळा दत्तक घेऊन विनामोबदला शिक्षण देणे उपयुक्त ठरणार आहे. गणित, इंग्लीश, व्यवहारज्ञान, व्याकरण, संभाषण कौशल्य, मॅनर्स आणि एटिकेट्स, योग किंवा कला शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची शाळांना गरज आहे. शिक्षक भरमसाट वेतन घेतात, यातून आम्हाला काय मिळणार? असा विचार करणाऱ्यांनी या वाटेकडे वळू नये. पण ज्यांना खरोखरच बदल घडविण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच याचा विचार करावा.
…तर प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत
शहरामध्ये अशा काही व्यक्ती आहेत, ज्या कोणताही गवगवा न करता प्रसिद्धी पराङ्मुख राहून शाळांमध्ये जाऊन स्वेच्छेने शिकवत आहेत. किमान अशा समविचारी मंडळींचा एक गट तयार झाला तर हळूहळू एक व्यासपीठ निश्चितच तयार होईल आणि प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होईल.









