दोन-तीन महिन्यांपासून पेन्शन बंद : दैनंदिन जीवनात अडचणी : तातडीने सुरू करण्याची मागणी
बेळगाव : शासनाकडून देण्यात येणाऱ्या दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा, निराधार लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दैनंदिन जीवन जगणे असह्य होऊ लागले आहे. याबाबत लाभार्थी तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र देण्यात येणारी पेन्शन का बंद केली आहे? याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने लाभार्थ्यांची परवड होऊ लागली आहे. शिवाय बंद असलेली पेन्शन तातडीने सुरू करावी, अशी मागणीही लाभार्थ्यांतून होत आहे. दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा, निराधार, लाभार्थ्यांना शासनाकडून मासिक पेन्शन दिली जाते. त्यामुळे त्यांना आर्थिक खर्च भागविणे सोयीस्कर होते. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांपासून काही लाभार्थ्यांची पेन्शन बंद झाली आहे. त्यामुळे लाभार्थी तहसीलदार कार्यालयाला हेल्पाटे मारू लागले आहेत. पेन्शनबाबत कार्यालयात समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबना होऊ लागली आहे. ई-केवायसी व बँकेकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकारात लाभार्थ्यांची परवड होताना दिसत आहे. जिल्ह्dयात लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र मध्यंतरी कमी वय असणाऱ्या लाभार्थ्यांनीही खोटी कागदपत्रे देऊन वयोवृद्ध पेन्शनचा लाभ घेतला आहे. हे थांबविण्यासाठी शासनाने अनेकांची पेन्शन बंद केली होती. दरम्यान अद्यापही अनेकांची पेन्शन बंद आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र, बेळगाव वन आणि तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांचे हेलपाटे सुरू आहेत. मात्र नेमकं घोडं थांबलय कुठं हेच लाभार्थ्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे पेन्शनपासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी दैनंदिन जीवनात अडचणी येवू लागल्या आहेत.
लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पेन्शन जमा
पेन्शनमध्ये पारदर्शकता रहावी यासाठी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पेन्शन जमा केली जाते. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून पेन्शन जमा झाली नसल्याने लाभार्थी तहसीलदार कार्यालयात चौकशीसाठी येऊ लागले आहेत. मात्र या ठिकाणी देखील समर्पक उत्तरे मिळत नसल्यामुळे कोठे जावे? असा प्रश्न वयोवृद्ध लाभार्थ्यांना पडू लागला आहे. पेन्शनचे काम गाव पातळीवरील ग्रामवनमध्ये उपलब्ध करून द्यावे, अश मागणीही लाभार्थ्यांतून होत आहे. विधवा, दिव्यांग, अंध, निराधार, लाभार्थ्यांचे पेन्शनवरच अर्थकारण चालते. मात्र पेन्शनच बंद झाल्याने जगायचे कसे? असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. एकीकडे शासन योजना तुमच्या दारी अशी घोषणा करते. तर दुसरीकडे लाभार्थ्यांना पेन्शनसाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरावे लागत आहे.
नवीन अर्ज भरणा सुरू
लाभार्थ्यांच्या पेन्शन सुरळीत सुरू आहेत. काही लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही. तर काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. लाभार्थ्यांनी प्रथमता ई केवायसी करावी आणि बँक खातीही सुरळीत सुरू करावी. शिवाय नवीन अर्ज भरणा देखील सुरू आहे.
-बसवराज नागराळ -तहसीलदार ग्रेड-1









