वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अवमानना प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर पेले आहे. या प्रकरणात त्यांना गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. परिणामी, त्यांना त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही गमवावे लागले होते. अद्यापही ते लोकसभेबाहेरच आहेत.
गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत. त्यांनी बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अयोग्य असून आपण दोषी नाही आहोत असा दावा त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. आपण क्षमायाचनाही करणार नाही. ती करायची असती तर इतका वेळ आपण वाट पाहिली नसती, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील मूळ तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्यावरही गांधी यांनी टीका केली आहे. पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या तक्रारीत आपला उल्लेख अहंकारी आणि मदांध (अॅरोगंट) असा केल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. आपल्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी त्यांची मागणी आहे.









